सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी कारभार करीत असताना स्वपक्षातील पदाधिका-यांकडूनच जाणीवपूर्वक हेटाळणी केली जात असल्यामुळे वैतागून उद्या गुरुवारी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. राजकीय वरदहस्त नसलेल्या कोणत्याही महिला लोकप्रतिनिधीला जिल्हा परिषदेत काम करणे कठीण असल्याची खंत डॉ. माळी यांनी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील भोंगळपणा चव्हाटय़ावर आला आहे. विशेषत: अध्यक्षपद सांभाळणाऱ्या महिलेचा सन्मान ठेवता येत नसल्याची बाबही उघड झाली आहे.
आतापर्यंत विजयसिंह मोहिते-पाटील यांचे एकहाती वर्चस्व असणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या २०१२ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीला उधाण येऊन मोहिते-पाटील यांना सत्तेपासून रोखत पक्षांतर्गत विरोधकांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, आमदार दीपक साळुंखे, पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदींनी एकत्र येऊन मोहिते-पाटील यांची जिल्हा परिषदेतील सत्ता संपुष्टात आणताना माढा तालुक्यातील मोडिनबच्या डॉ. निशिगंधा माळी यांना अध्यक्षपद बहाल केले होते. येत्या सप्टेंबपर्यंत त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत होती. परंतु डॉ. माळी यांना अध्यक्षपद सांभाळताना कधीही समाधान वाटेल, असे कार्य करता आले नाही.
आपल्या राजीनाम्याचा निर्णय पत्रकार परिषदेत  जाहीर करताना डॉ. माळी यांनी स्वपक्षातील सहकारी पदाधिका-यांच्या संकुचित वृत्तीवर हल्लाबोल केला. स्वपक्षातील अन्य पदाधिका-यांनीच सातत्याने अडथळे निर्माण केल्यामुळे आपली घुसमट होत गेली. अध्यक्षा म्हणून आपण केवळ ‘बाहुली’ ठरल्या असून अध्यक्षपदाची खुर्ची गेल्यानंतर माणूस म्हणून जगायची तरी लायकी राहील काय, असा प्रश्न निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पदाला न्याय देता येत नसल्यामुळे अध्यक्षपद सांभाळताना अपराध्यासारखेच वाटते. आपल्याकडे आशेने काम घेऊन येणाऱ्या जिल्ह्य़ातील सामान्य जनतेची कामेच होऊ द्यायची नाहीत, असा चंगच अनेकांनी बांधला आहे. आतापर्यंत  जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसताना कोणाची कामे केली, हे आठवतदेखील नाही, अशी खंतवजा गाऱ्हणे डॉ. माळी यांनी मांडले.
आपल्या पश्चात अन्य कोणतीही महिला अध्यक्षपदावर विराजमान झाली तरी तिच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असायलाच हवा. म्हणजेच पती, दीर, सासरा, भाऊ यांच्यापैकी कोणी तरी राजकारणात वजन ठेवून असायला हवे. जर तसे असेल तरच आपल्या सारख्या महिलेलाही पदावर राहून काम करताना न्याय देता येऊ शकेल. आमच्या पाठीमागे कोणताही राजकीय वारसा नाही. त्यामुळे सहकारी पदाधिका-यांकडूनच टिंगल टवाळी, हेटाळणी होते. म्हणूनच अध्यक्षपदाची खुर्ची सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षांचाच योग्य सन्मान न ठेवता उलट त्यांची हेटाळणी करण्याचे उद्योग स्वपक्षातील पदाधिका-यांकडूनच होत असल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनागोंदी पुन्हा चव्हाटय़ावर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या अनागोंदी कारभाराची कुजबूज सुरू होती. परंतु जिल्हा परिषदेवर वर्चस्व ठेवणाऱ्या नेत्यांनी त्याकडे काणाडोळा केला. त्यामुळे ही दुरवस्था कायम राहून त्याची परिणती अखेर जिल्हा परिषद अध्यक्षांना पायउतार होण्याचा निर्णय घेण्यावर झाल्याने राष्ट्रवादीची तेवढीच नाचक्की झाल्याचे बोलले जाते.