पोलीस स्टेशन आणि त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक हा नेहमीच चच्रेचा विषय राहिला आहे. तक्रार घेऊन येणाऱ्या माणसाला आरोपीच्या नजरेतून पाहण्याची पोलिसांची वृत्ती याला कारणीभूत ठरली आहे, पण रायगड पोलीस आता याला अपवाद ठरणार आहे.

पोलिसांकडे येणाऱ्या सामान्य माणसांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळावी, त्यांच्या तक्रारींचे निर्धारित वेळेत निराकरण व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्याधुनिक समाधान कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

दैनंदिन जीवनात विविध कारणांसाठी सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची  वेळ येते. कधी तक्रारीसाठी, कधी ना हरकत दाखल्यांसाठी, कधी चारित्र्य पडताळणीसाठी, कधी आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी प्रत्येक जण पोलीस स्टेशनची पायरी चढत असतो. मात्र पोलिसांचे नाव काढले तरी अनेकांना धडकी भरते, मनावर दडपण येते, कारण असते ते पोलिसांकडून मिळणारी वागणूक आणि प्रत्येक गोष्टीला संशयाच्या नजरेतून पाहण्याची वृत्ती.

सामान्य माणसाच्या मनात पोलिसांबद्दल असलेली हीच अढी आता दूर करण्यासाठी रायगड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्यांचे, एकाच ठिकाणी आणि ठरावीक मुदतीत निराकरण व्हावे, तक्रारदारांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळावी यासाठी समाधान कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

विविध प्रकारचे परवाने, चारित्र्य पडताळणी, पारपत्र पडताळणी, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या तक्रारी यांचे निवारण या समाधान कक्षामार्फत केले जाणार आहे. एक खिडकी योजनेच्या धर्तीवर हा कक्ष कार्यरत असणार आहे. कक्षात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे आणि समस्येचे निराकरण सात दिवसांत केले जाणार आहे. कक्षात दोन साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पाच कर्मचारी तनात असणार आहेत. यात समाधान कक्षाचे प्रमुख आणि जनसंपर्क अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

हा कक्ष अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असणार आहे. कक्षात येणाऱ्या नागरिकांसाठी वातानुकूलित प्रतीक्षालयाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात वर्तमानपत्र, साप्ताहिक, विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी मोफत उपलब्ध असणार आहेत. राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या सेवा हमी कायद्याच्या कक्षेत समाधान कक्ष कार्यरत असणार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि कर्मचाऱ्याला सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचे बंधन कक्षातील अधिकाऱ्यावर असणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या तक्रारीचे सात दिवसांत निराकरण कसे होईल हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. सुरुवातील पोलीस अधीक्षक कार्यालयात या समाधान कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आगामी काळात जिल्ह्य़ातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये असे समाधान कक्ष सुरूकरण्याचे नियोजन आहे.

समाधान कक्षाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आणि सौजन्यपूर्ण सेवा देण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. यामुळे समस्यांचा जलदगतीने निपटारा होऊ शकेल आणि पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, असे मत पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी व्यक्त केले.