धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील टेंभा या गावात एका मुलाने आपल्या आईच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

धुळ्यातील साक्री तालुक्यातील टेंभा येथील रायमल दुर्जन देसाई याने आई अहिलुबाई दुर्जन देसाई (वय ५०) यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे ठार मारले. रविवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. याबाबत सायमल दुर्जन देसाई यांनी पोलिसांना फिर्याद दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल भाबड, उपनिरीक्षक योगेश खटकळ यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन रायमल देसाई यास अटक केली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु असून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.