जागतिक महासत्तेच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या भारतीय समाजात जातीयवादाची पाळेमुळे किती घट्ट रोवली आहेत, हे अहमदनगर जिल्ह्य़ातील दलित अत्याचारांच्या घटनांवरून दिसून येते. सोनई, खर्डा आणि आता पाथर्डी या तीनही ठिकाणी लागोपाठ घडलेल्या घटनांमधून दलित अत्याचाराने कशा प्रकारे क्रौर्याची परिसीमा गाठली आहे, हे दिसून येते. सोनईत दलित समाजातील तीन युवकांचे तुकडे करून कूपनलिकेत टाकण्यात आले होते. खर्डा येथे युवकाचा अनन्वित छळ करून खून करण्यात आला, तर पाथर्डीत (जवखेडे खालसा) येथेही तिघांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आहेत. घटनांचा तपास होताना या क्रौर्याच्या मानसिकतेचाही शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नगर जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये उच्चवर्गीयांकडून दहशत निर्माण केली जाते आणि या दहशतीत दलित समाज भरडला जातो. गुन्हे दाखल होत असले तरी चळवळीतील कार्यकर्ते, पोलीस अधिकारी व वकील यांच्या मतानुसार अनुसूचित जातिजमाती अत्याचारप्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्हय़ात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाणही कमीच आहे. येथील न्यायालयात तर १९९५ पासूनचे खटले प्रलंबित आहेत. रेंगाळणारे खटले आरोपींच्या धारिष्टय़ाला पाठबळ करणारे ठरतात. गावांमधील ग्रामपंचायती आणि पोलीस प्रशासनही दलित अत्याचार रोखण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत. खडर्य़ाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने दलित अत्याचारप्रतिबंधक समिती स्थापन करून गावनिहाय वादांचा शोध घेतला जाईल आणि त्यातून पुढील अत्याचार टाळण्यासाठी या कारणांचा समूळ नायनाट केला जाईल, असे जाहीर केले होते.
सामाजिक चळवळींचा, संघटनांचा दबाव कमजोर झाल्याने जिल्हय़ात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता राजकीय गटातटात विभागला गेल्याचाही हा परिणाम आहे. जिल्हय़ातील सामाजिक ऐक्याच्या चळवळीचा दबदबाही कमी झाला आहे.
– अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते top01
हे तालुके आघाडीवर
अहमदनगर, नेवासे, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, नगर शहर
अत्याचाराची कारणे
ग्रामपंचायत निवडणुका, प्रेमसंबंध, त्यातून होणारे अपहरण, शेतीचे वाद, अतिक्रमणे, दलित महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन बलात्कार, उच्च जातींचा धनदांडगेपणा, जातीय मानसिकता.

सोनई, खर्डा व पाथर्डी या तिन्ही घटनांमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे निदर्शनास येत आहे. दलितांना आपल्या पंक्तीला बसवले जाते, मात्र त्यांच्याबद्दल असलेल्या अपार द्वेषाच्या भीषणतेची धग कायम आहे, हेच या घटना दाखवतात. खैरलांजीतही हेच घडले. यासाठी या क्रौर्याच्या मानसिकतेचे विश्लेषण होऊन त्याच्या कारणांचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे.
-अ‍ॅड. जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे आमदार