मराठवाडय़ातील प्रमुख १४ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ५.६९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. काही जिल्हय़ांत पावसाच्या सरी येऊन गेल्या असल्या तरी पाऊस तसा मोठा नव्हता. अनेक जिल्हय़ांत पावसाने अजूनही पाठ फिरवलेलीच आहे. त्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला पाणीसाठय़ात दिवसेंदिवस घट होते आहे. जायकवाडीसारख्या मोठय़ा धरणातदेखील केवळ ४.८७ टक्के पाणीसाठा आहे. येत्या काही दिवसांत मोठा पाऊस झाला नाही तर अडचणी वाढतील, असे वातावरण आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांतून ‘ये रे घना’ची साद घातली जात आहे.
मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्याची टंचाई नेहमीचीच झाली आहे. ५००हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जायकवाडी जलाशयात १०५.६८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ४.८७ टक्के एवढी आहे. उपयुक्त पाणीसाठा साधारणत: ४५ दिवस औरंगाबाद शहराला पिण्यासाठी पुरेल, असे सांगितले जाते. निम्नतेरणा आणि मांजरा ही दोन धरणे या वर्षी कोरडीच राहिली. निम्नदुधना, मनार, येलदरी येथे २० टक्क्यांहून पाणीसाठा आहे. विष्णुपुरीमध्ये १४.४१ टक्के पाणीसाठा आहे. दिवसेंदिवस बाष्पीभवनाचा वेगही वाढू लागलेला आहे. पावसाचा मात्र अजून पत्ताच नाही, असे वातावरण आहे. कधीतरी एखाददुसरी मोठी सर येऊन जाते. पेरणीसाठी मोठय़ा पावसाची नितांत आवश्यकता आहे.                               वरुणराजा रुसला; शेतकरी हवालदिल
वार्ताहर, बीड
जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. जिल्हय़ात जूनच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
 बीड जिल्हय़ात सर्वसाधारण खरीप क्षेत्र ५ लाख ६५ हजार ७०० हेक्टर आहे. खरिपाची पेरणी करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला होता. कृषी विभागानेही खत आणि बियाणांचे योग्य नियोजन केले होते. जूनच्या पहिल्या आठवडय़ात मृग नक्षत्राने जिल्हाभरात हजेरी लावली. त्यानंतर पाऊस वेळेवर पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. शेतकऱ्यांनी खत आणि बियाणांची खरेदी केली. पाच लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील शेती अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्हय़ातील कापूस लागवडीचे काम अंतिम टप्प्यात होते. या वर्षीही कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एकूण क्षेत्रापकी साडेतीन लाख हेक्टरवर कापसाची लागवड होईल, असे अपेक्षित होते. परंतु अद्यापही पाउस न झाल्याने कापसाची लागवडही लांबली आहे. गेल्या आठवडाभरापासून ऊनही तापलेलेच आहे. दुपापर्यंत पडणारे कडाक्याचे ऊन आणि त्यानंतर वाहणारे वारे यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.