वार्षिक सरासरीच्या अपेक्षित तुलनेत ५५ टक्के, तोही अनियमित पाऊस झाल्याचा फटका जिल्ह्य़ात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला. पावसाच्या लहरीपणाचा परिणाम सोयाबीनचे उत्पादन आणि दर्जा या दोन्हींवर झाला आहे.
जालना बाजार समिती क्षेत्रात मागील हंगामात (ऑक्टोबर १३ ते जानेवारी २०१४) सोयाबीनची आवक ४ लाख ६० हजार क्विंटल झाली होती. चालू हंगामात याच काळात ही आवक १ लाख ८५ हजार क्विंटल, म्हणजे जवळपास ६० टक्के गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी झाली. गेल्या १०-१२ वर्षांपासून जिल्ह्य़ात सोयाबीन पेरणीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. २००७-२००८च्या हंगामात जिल्ह्य़ात १३ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली येईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात जवळपास ३५ हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आले. पुढे हे क्षेत्र वाढून २०१०-११च्या हंगामात ४७ हजार हेक्टर व २०१२-१३मध्ये ८३ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले. २०१३-१४च्या हंगामात हे क्षेत्र १ लाख १० हजार हेक्टरपर्यंत पोहोचले.
या वर्षीही (२०१४-१५) जिल्ह्य़ात जवळपास १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आले. जाफराबाद, भोकरदन व मंठा हे तालुके चालू वर्षी सोयाबीनमध्ये आघाडीवर राहिले. जाफराबाद २५ हजार हेक्टर, मंठा २५ हजार हेक्टर, तर भोकरदन २१ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली आले. बदनापूर (साडेतीन हजार हेक्टर) व अंबड (२ हजार ८०० हेक्टर) हे तालुके तुलनेत मागे राहिले. जालना तालुक्यात जवळपास १४ हजार हेक्टर, तर परतूर तालुक्यातही तेवढेच क्षेत्र या वर्षी सोयाबीनखाली आले. परंतु पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला.