नवीन काही नाही, मात्र रेल्वेच्या जुन्याच योजनांवर काहीसा वाढीव निधी देऊन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जिल्हय़ाला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. नागरिकांच्या भावना संमिश्र असल्या तरी, नगर ते पुणे (केडगाव चौफुला मार्गे) या थेट रेल्वेमार्गाला मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसांत हे सुरू होईल, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिल्लीहून ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
रेल्वेमंत्री प्रभू यांनी गुरुवारी संसदेत रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. नगरकरांना मुख्यत्वे नगर ते पुणे थेट रेल्वे, नगर-बीड-परळी रखडलेला रेल्वेमार्ग, दीर्घकाळ प्रलंबित नगर-कल्याण (माळशेज मार्गे), दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व अपूर्ण राहिलेले विद्युतीकरण या योजनांबाबत मोठी अपेक्षा होती. या सर्वच गोष्टींवर अर्थसंकल्पात कमी-अधिक तरतुदी झाल्या असून, याशिवाय बेलापूर (श्रीरामपूर)-नेवासे-शेवगाव-गेवराई या रेल्वेमार्गाच्या ट्रॅफिक सव्र्हेसाठी १ कोटी ८० लाख रुपये, शिर्डी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाच्या अभियांत्रिकी सव्र्हेसाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची आल्याची माहिती खासदार गांधी दिली.
गांधी यांनी सांगितले, की नगरकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नगर-पुणे या केडगाव चौफुला मार्गे रेल्वेमार्गाला या अर्थसंकल्पात मान्यताच मिळली आहे. गेल्या अर्थसंकल्पात त्याचे सर्वेक्षण झाले होते. आता त्यावर १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती अल्प असली तरी यातून येत्या सहा महिन्यांत हे कामच सुरू होईल, असा दावा त्यांनी केला. नगर-बीड-परळी या दीर्घकाळ रेंगाळलेल्या रेल्वेमार्गासाठी या अर्थसंकल्पात १२५ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही आजवरची सर्वाधिक तरतूद आहे, असे गांधी यांनी सांगितले. नगर-कल्याण (माळशेज मार्गे) या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वेमार्गाचे गेल्या वर्षी सर्वेक्षण झाले. यंदा त्याच्या अत्याधुनिकीकरणाचा विचार करण्यात आला असून, या सर्वेक्षणासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती गांधी यांनी दिली.
नगर येथील रेल्वेस्थानकावर पश्चिमेच्या बाजूने दुसऱ्या फलाटावर प्रवेशद्वार करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती गांधी यांनी दिली. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे मनमाड ते नगपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून येत्या वर्षांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करून गांधी यांनी एकुणात या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे हरजित वधवा यांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वेचे स्वच्छता अभियान व दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाबाबत मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ठळक बाबी
– नगर-केडगाव चौफुला-पुणे रेल्वेमार्गासाठी १८ कोटींची तरतूद
– नगर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला दुसऱ्या फलाटावर प्रवेशद्वार- ५० लाखांची तरतूद
– नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी १२५ कोटींची तरतूद
– नगर-कल्याण (माळशेज मार्गे) रेल्वेमार्गाच्या अद्ययावतीकरणाचे सर्वेक्षण
निराशाजनक अर्थसंकल्प- विखे
विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी रेल्वे अर्थसंकल्पाबाबत निराशा व्यक्त केली. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नरंजन आहे. त्यात कृतीपेक्षा संकल्पनांचाच मोठा भरणा असून त्यातून राज्याला काहीही मिळाले नाही. घोषणाबाज सरकारचा हा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याची टीका विखे यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केली. राज्यातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आले नाही, असे त्यांनी सांगितले.