अक्षयकुमारच्या ‘स्पेशल छब्बीस’ या हिंदी चित्रपटातील कथानकाची प्रेरणा घेऊन मिरजेत आयकर अधिकारी असल्याची बतावणी करीत दरोडा टाकणाऱ्या ९ जणांच्या टोळीला सांगली पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने पुण्यात अटक केली. या टोळीचा सूत्रधार महाविद्यालयील विद्यार्थी असून अन्य आरोपी पुण्यात रिक्षाचालक म्हणून काम करणारे आहेत.
मिरजच्या विद्यानगरमध्ये राहणाऱ्या अभिजित जाधव यांच्या घरात घुसून आपण आयकर अधिकारी व मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करीत व मारहाण करून २१ तोळे सोने, चांदीचे दागिने आणि रोख ४ लाख रुपये टोळीने लुटले होते. शुक्रवार २७ मार्च रोजी रात्री सव्वा नऊ ते अकरा वाजेपर्यंत या टोळीचा कारनामा जाधव यांच्या घरात सुरू होता. घरातील मंडळींनी इतरांशी संपर्क साधू नये म्हणून टोळीने दोन मोबाईल काढून घेऊन सीमकार्ड काढले व मोबाईल लंपास केले होते.
या टोळीच्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे पोलीस यंत्रणा चक्रावली होती. या लुटीसंदर्भात स्थानिक पातळीवरून माहिती पुरवली गेली असल्याच्या संशयावरून स्थानिक पातळीवर चौकशी केली असता राहुल सतीश माने, वय २२ हा महाविद्यालयीन युवक पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता संपूर्ण कथानक उलगडले.
या प्रकरणी पोलिसांनी राहुल माने याच्यासह रणजितसिंग लक्ष्मणसिंग रजपूत वय २८, रा. पिलीव ता. माळशिरस, गोटय़ा ऊर्फ सोमनाथ बाळासाहेब शेलार वय २५, नितीन वसंत पारधी वय ३०, धोंडीराम वसंत िशदे ३२, उमेद रफिक शेख २३, संतोष विठोबा कोळी २३, आरिफ हसनसाब शेख २३ आणि संतोष तुकाराम गाडेकर २३ सर्व रा. पुणे या नऊजणांना पोलिसांनी अटक केली आहे. यापकी रजपूत याच्या मालकीची फोर्ड कंपनीची मोटार या गुन्ह्यासाठी वापरण्यात आली. पोलिसांनी मोटार एमएच ०६ एएम ९९ ही जप्त केली असून लुटलेल्या ऐवजापकी २ लाख ७० हजाराचे दागिने व १ लाख २४ हजाराची रोखड हस्तगत केली आहे.
िहदी सिनेमातील कथानकाप्रमाणे लूट करण्याची कल्पना मिरजच्या राहुल याने प्रत्यक्षात आणण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालकांचे सहकार्य घेतले. या टोळीने छाप पाडण्यासाठी झकपक पोषाख केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींपकी गोटय़ा शेलार याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल असून धोंडीराम िशदे याच्याविरुद्ध दोन दरोडय़ाचे गुन्हे दाखल आहेत, तर संतोष गाडेकर याच्याविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे.
घटना घडल्यानंतर पोलिसांची वेगवेगळी पथके तपासात कार्यरत होती. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व कर्मचारी सुनील भिसे, संजय कांबळे, सागर लवटे, योगेश खराडे, नीलेश कदम, वैभव पाटील आदींच्या पथकाने या टोळीला जेरबंद केले असल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पत्रकार बठकीत सांगितले.