विदर्भ आणि मराठवाडय़ात दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दहा जिल्ह्य़ांच्या यादीतून यवतमाळला वगळून त्याऐवजी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा समावेश करण्यात आला आहे. यवतमाळात यापूर्वीच ‘अमूल’च्या माध्यमातून दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याने हा बदल करण्यात आल्याचे कृषी खात्याकडून कळविण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाडा या भागात दुधाचे उत्पादन कमी होत असल्याने ते वाढावे म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून वरील दोन्ही मागासभागातील एकूण दहा जिल्ह्य़ात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून विशेष प्रकल्प राबविण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. प्रस्तावित दहा जिल्ह्य़ांपैकी यवतमाळ जिल्ह्य़ात अमूलमार्फत यापूर्वीच दुध नियोजनाचे काम सुरू आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ाऐवजी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा समावेश प्रकल्पांच्या यादीत करण्यात आला आहे. या प्रकल्पात विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ आणि मराठवाडय़ातील लातूर, नांदेड, जालना व उस्मानाबाद या जिल्ह्य़ांचा समावेश होता. मात्र, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने केलेल्या सूचनेनंतर यवतमाळऐवजी आता चंद्रपूरचा समावेश करण्यात येणार आहे.

२०१७ ते २०२० या काळात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रकल्प संचालक म्हणूून जात पडताळणी समिती अमरावतीचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण  होईपर्यंत त्यांची इतत्र बदली करू नये, अशी विनंती महसूल खात्याकडे विनंती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पाकरिता कृषी खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला शासकीय दूध योजनेची जागा भाडेपट्टीवर देण्यात आली आहे. तसा करारही यापूर्वीच झाला आहे.