महापालिका व वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल समिती यांच्यातील वादासंदर्भात संकुल समिती लवकरच मनपाला तडजोडीचा प्रस्ताव सादर करणार आहे. या प्रस्तावावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. गाळेधारकांकडून कराची वसुली, संकुलाच्या वाणिज्य वापरामध्ये मनपाचा हिस्सा, संकुलातील वादग्रस्त इमारत, उच्च न्यायालयातील याचिका, आरक्षण आदी बाबींचा या प्रस्तावात समावेश केला जाणार आहे.
संकुलाबाबतच्या वादावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या पुढाकारातून आज, बुधवारी सायंकाळी कवडे यांच्या दालनात बैठक झाली. त्यात आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, माजी आमदार दादा कळमकर, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, नगरसेवक दीप चव्हाण व कैलास गिरवले, खेळाडूंचे प्रतिनिधी अनंत देसाई, रंगनाथ डागवाले, सुनील जाधव तसेच मनपा आयुक्त विलास ढगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, विकसक जवाहर मुथा आदी उपस्थित होते.
कवडे यांच्यासह आमदार जगताप, कळमकर, घुले यांनी वादावर सकारात्मक निर्णय होऊन संकुलात खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर एकमत व्यक्त केले. त्यानुसारच तडजोडीच्या प्रस्तावावर मनपाने सभेत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना कवडे यांनी केली. सभेत सकारात्मक निर्णय होण्याची जबाबदारी आमदार जगताप, महापौर यांच्यावर सोपवण्यात आली. गाळय़ांची विक्री ज्या दिवसापासून झाली, तेव्हापासून त्यांच्याकडील कर मनपाने वसूल करावा, असे ठरले. संकुलाच्या देखभालीसाठी, सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याने वाणिज्य वापरातील हिस्सा तसेच मनपाकडून उपलब्ध करून घ्यावयाच्या सुविधा यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. वादग्रस्त इमारतीचे मनपाकडे हस्तांतरण करण्यास नकार देण्यात आल्याचे समजले. मनपा व इतर काही जणांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकाही महासभेतील निर्णयानंतर मागे घेण्याचे ठरले.