पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्हाला बलुचिस्तानच्या लोकांची चिंता आहे, मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणा-या ११ कोटी मराठी जनांची तुम्ही उपेक्षा का करता असा सवाल ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास होणा-या विलंबावरुन श्रीपाल सबनीस यांनी थेट नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात सबनीस यांनी खास त्यांच्या शैलीत मोदींना ‘मन की बात’ सांगितली आहे. या पत्रात सबनीस म्हणतात, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तुम्ही स्वतंत्र बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित करुन इतिहास रचला आहे. आता पाकिस्तानला काश्मीरऐवजी पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान या प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या या भूमिकेने मी प्रभावित झालो आहे असे सबनीस यांनी पत्रात म्हटले आहे.
मोदींचे कौतुक करतानाच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरुन सबनीस यांनी मोदींना खडे बोलही सुनावलेत. माझी मराठी भाषा सर्व निकषांवर पात्र ठरुनही तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही अशी खंत सबनीस यांनी पत्रात व्यक्त केली आहे. तुम्हाला बलुचि लोकांच्या स्वातंत्र्याची चिंता आहे. मग ११ कोटी मराठी जनांची उपेक्षा का करत आहात असा खडा सवालही त्यांनी मोदींना विचारला आहे. तुम्ही सहृदयी असूनही ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये हेच आमचे सांस्कृतिक दुःख आहे अशा शब्दात सबनीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिचा आदर करा अशी मागणी सबनीस यांनी या पत्राद्वारे केली आहे.