दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत पुनर्मूल्यांकनाची सुविधा होती. त्यामध्ये पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जानुसार संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची बेरीज बरोबर आहे का ते तपासले जात असे. उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मागितलेले विद्यार्थीच पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकणार आहेत. छायांकित प्रत पाहून त्यावर आपल्या विषय शिक्षकांचे मत घेऊन त्यानंतरच विद्यार्थी पुनर्तपासणीची मागणी करू शकतात. विद्यार्थ्यांने पुनर्तपासणीसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्येक विभागातील सीनिअर मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर उत्तरपत्रिका पाहणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळ्या पातळींवर आपली उत्तरपत्रिका तपासता येणार आहे. विद्यार्थी आता पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. आपल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत पाहू शकतात आणि त्या वेळी उत्तरपत्रिका तपासणीबाबत काही आक्षेप असल्यास पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकतात. या वर्षी राज्यातून बारावीच्या साधारण ४ हजार आणि दहावीच्या ७ हजार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मागवल्या होत्या. त्यांपैकी काही उत्तरपत्रिकांमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यामुळे या वर्षीपासून छायांकित प्रती मागवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सर्जेराव जाधव यांनी सांगितले.