राज्य परिवहन मंडळाच्या शिवनेरी बसचा टायर फुटून ती दुसऱ्या खासगी बसवर आदळून झालेल्या अपघातात  एक ठार, तर नऊ जण जखमी झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी खोपोलीजवळ हा अपघात झाला.  शिवनेरी स्वारगेटहून मुंबईकडे जात होती तर जय ट्रॅव्हल्सची खासगी बस गुजरातहून पुण्याला निघाली होती.

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आडोशी गावाजवळ भरधाव वेगातील शिवनेरी  बसचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती पुण्याला जाणाऱ्या मार्गावर गेली आणि खासगी बसवर आदळली.

या अपघातात पूजा प्रल्हाद माने या मुलीचा मृत्यू झाला. तर शिवनेरी बसचा चालक बालाजी सुकाले, धीरज कटारिया, सुनील िशदे, विद्याधर वैद्य, भाग्यश्री सोनावणे, किशोर भागवत, प्रल्हाद माने यांच्यासह अन्य दोन प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर द्रुतगती मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

अपघातातील जखमींवर खोपोलीतील जाखोटिया व कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ही शिवनेरी बस खासगी ट्रॅव्हल्समार्फत चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सकडून चालवल्या जाणाऱ्या शिवनेरी बसेसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे.