राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांची वेतनवाढ, सोयी सवलती आणि त्यांच्यावर होणार्‍या अन्यायासंबंधीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासन याची दखल घेत नसल्याने याविरुध्द गुरुवारी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेकडून एसटी विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळातील कामगारांचा वेतन करार प्रलंबित असून या प्रश्‍नांची सोडवणूक केली जावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेच्यावतीने गुरुवारी दुपारी धुळे शहरात निदर्शेने करण्यात आली. यावेळी कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि कर्मचार्‍यांनी अंगावरील शर्ट काढून आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी विभाग प्रमुख राजेंद्र देवरे यांना निवेदनही देण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यानुसार सातवा वेतन आयोग लागू करावा, ७ टक्के महागाई भत्ता लागू करून त्याचा फरक त्वरीत मिळावा, चालक कम वाहक ही दुहेरी कामगिरी बंद करावी, कामगारांवर जाचक असे शिस्त व अपील कार्यपध्दतीचा गैरवापर करुन काढण्यात आलेले जाचक परिपत्रके रद्द करावेत, लांब पल्ल्याच्या फेर्‍या पुर्ववत सुरू करण्यात याव्यात, नो पार्कींग झोन अस्तित्वात आणावे, कामगारांचे शोषण थांबवावे, चालक-वाहक आणि कार्यशाळा कर्मचार्‍यांना गणवेशांचे कापड पुरवावे, अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली. तसेच शासनाने याची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेने म्हटले आहे. कामगार नेते पोपटराव चौधरी, विभागीय अध्यक्ष दिपक पांडव, सचिव संतोष वाडीले, प्रादेशिक उपाध्यक्ष जी.एस. ठाकरे, विभागीय कार्याध्यक्ष रविंद्र शिरसाठ, खजिनदार दिलीप राजपुत आदी या आंदोलनात सहभागी झाले.