सणासुदीच्या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांना आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. कामावर रुजू न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे हे आवाहन धुडकावले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहिल अशी भूमिका घेतली आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्यासोबतच इतर मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या काळात संपाचे हत्यार उपसले आहे. गाड्या रस्त्यावर आणायच्याच नाहीत, अशी भूमिका घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांच्या संपाला दाद न देता खासगी बस गाड्या आगारात बोलावून प्रवाशांची सोय करुन दिली. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांना आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. न्यायालयानेही एसटीच्या कामगारांना संपावर जाण्यास प्रतिबंध केल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला लोकोपयोगी सेवा घोषित केल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यास त्यांना तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे औद्योगिक न्यायालयाने घेराव, निदर्शने, मंदगतीने काम करणे या गोष्टींना प्रतिबंध केल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

औद्योगिक अधिनियमानुसार कलम २२ अन्यये कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना त्यांना संपावर जाता येणार नाही. त्यामुळे सध्याचा संप हा बेकायदा असून यात सहभागी होणाऱ्यावर तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच कराराचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ६ महिने शिक्षा आणि प्रतिदिन २०० रुपये दंड होऊ शकतो, असे परिपत्रकात म्हटले आहे. त्वरीत कामावर हजर न झाल्यास कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महामंडळाने पत्रकातून जारी केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांना अच्छे दिन आले आहेत. सध्या पुण्याच्या स्वारगेट आगारात ६० खासगी बस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल आहेत. दरम्यान, आगारातून उद्या देखील बस बाहेर पडणार नाही असे एसटीच्या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. सरकारने संपाकडे दृर्लक्ष केल्याने कर्मचारी आक्रमक झाले असून एसटी बसच्या हवा सोडण्यात येत आहेत. संध्याकाळी ५ वाजता शिवशाहीची एकच बस या आगारातून सोडण्यात आली.

पुणे विभागातून एसटीच्या माध्यमांतून दररोज सुमारे १ कोटी रुपयांचे उत्पन्न होते. मात्र, आजच्या संपामुळे हे उत्पन्न बुडाले आहे. विभागाने आजच्यासाठी सुमारे २ हजार ६५८ एसटी बसचे नियोजन केले होते. मात्र, संपामुळे ते पूर्णपणे कोलमडले आहे.