सात महिन्यांपूर्वी शहरातील खड्डे बुजविण्यासाठी ठिगळपट्टी करा, असा आदेश स्थायी समितीने दिला. मात्र, एकही काम सुरू झाले नाही. मंजूर केलेला निधी मग कोणत्या कामावर खर्च झाला, हे कोडे स्थायी समिती अध्यक्ष विजय वाघचौरे यांनाच पडला आहे. रस्त्यांच्या कामाचा निधी अन्यत्र वापरल्याने रस्त्यांची कामे ठेकेदारांनी बंद केली आहेत. शहरभर खड्डे जशास तसेच आहेत. त्यामुळे मान्यता दिलेल्या ३ कोटी ६२ लाख रुपयांच्या ठिगळपट्टय़ा आता पुन्हा चच्रेत राहण्याची शक्यता आहे.
 रस्त्यांच्या कामाचा निधी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आला. ज्या ठेकेदारांनी रस्त्यांची कामे केली, त्यांनाच निधी दिला गेला की नाही, हे सांगणे सत्ताधाऱ्यांसाठी अवघड झाल्याने कोणती कामे झाली, याचा तपशील वाघचौरे यांनी प्रशासनाकडे मागितला आहे. १९ जुलै रोजी पाच वॉर्डातील पॅचवर्कसाठी मंजुरी देण्यात आली होती. आदिनाथ कन्स्ट्रक्शन, अरोरा कन्स्ट्रक्शन, ए. एस. कन्स्ट्रक्श्न या ठेकेदारांना ही कामे देण्यात आली होती. त्यांनी एकही काम न केल्याचा आरोप करत रस्त्यांच्या अर्थसंकल्पित कामांसह कोणत्या ठेकेदाराला किती देयके दिली, याचा अहवाल सभापती वाघचौरे यांनी मागितला आहे. पुढील स्थायी समितीच्या बठकीतही यावर अधिक तपशील मागितला जाणार आहे.