३६५ कोटीचे कर्ज थकल्याने स्टेट बँकेची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्थिक आधारस्तंभ अशी ओळख असलेले येथील सुवर्ण व्यावसायिक तथा माजी खासदार ईश्वरलाल जैन हे स्टेट बँकेचे ३६५ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्या प्रकरणी अडचणीत आले आहेत. जैन यांच्या तीन संस्थांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने नोटीस बजावली आहे. त्यांच्या मालमत्तांवर प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. या कारवाईमुळे  राष्ट्रवादीच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले जैन यांनी पक्षाचे खजिनदार म्हणूनही काम पाहिले आहे. तिजोरीच्या चाव्या असतांना पक्षाला कधीच त्यांनी आर्थिक झळ बसू दिली नाही. विद्यमान परिस्थितीत मात्र बराच बदल झाला आहे. त्यांच्या मे.आर. एल. गोल्ड प्रा. लि. या सुवर्ण कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ७२ कोटी ३४ लाख १२३ रुपये ३४ पैसे कर्ज घेतले होते. तसेच मे.मनराज ज्वेलर्स प्रा. लि. या नावाने ७८ कोटी ९१ लाख ३६ हजार ६५८ रुपये ६७ पैसे आणि मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. या नावाने २१३ कोटी ४२ लाख ३५ हजार ९१८ रुपये ७६ पैसे असे कर्ज घेतले आहे. याप्रमाणे एकूण ३६४ कोटी ६७ लाख ७२ हजार ६९९ रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात या तीनही संस्था अयशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे हे संपूर्ण कर्ज ६० दिवसाच्या आत परतफेड करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी डिमांड नोटीसही देण्यात आली होती. या नोटीसनंतरही कर्जभरणा न झाल्याने बँकेने १२ जून रोजी सराफ बाजार परिसरातील मालमत्तेवर प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. तारण असलेली मालमत्ता सोडवून घेण्यासंदर्भात बँकेने जाहीर नोटीस देखील या तीनही संस्थांना बजावली आहे. या कारवाईमुळे सुवर्ण व्यवसायिकांसह सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हा व्यवहाराचा भाग आहे. यापलीकडे काहीच नाही. जी मालमत्ता बँकेकडे गहाण आहे ती अन्य कोणी खरेदी करू नये यासाठी ही माहिती बँकेने प्रसिद्ध केली आहे. यासाठी बँकेला माझे पूर्ण सहकार्य आहे.   – ईश्वरलाल जैन