संशोधकांमधील नेहमीच्या संघर्षांची किनार आता राज्य फुलपाखरालाही बसली असून समाजमाध्यमांवरून काही अभ्यासकांनी मांडलेले मत त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. २२ जूनला मंत्रालयात आयोजित राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘ब्ल्यू मॉरमॉन’ (राणी फुलपाखरू) प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला. हा निर्णय जाहीर होताच फेसबुक, व्हॉट्सअॅप या समाजमाध्यमांवरून हा निर्णय कसा चुकीचा आहे, यावर परखड प्रतिक्रिया उमटू लागल्याने या निर्णयाच्या समर्थकांनी मात्र त्याला आव्हान दिले आहे. त्यामुळे संशोधकांचे दोन गट आता आमनेसामने उभे ठाकले आहेत.
एखाद्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘ब्ल्यू मॉरमॉन’ची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करण्यात आली तेव्हा राज्यभरातूनच त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, अवघ्या दोन दिवसाने ईशान्य भारतातील भीमताल तलावाजवळील फुलपाखरू संशोधन केंद्रातील अभ्यासक पीटर स्मेटासेक यांनी हे फुलपाखरू संत्रावर्गीय वनस्पतींसाठी घातक असल्याचे विधान समाजमाध्यमांवरून केले. लिंबू व संत्रावर्गीय वनस्पतीवर तण म्हणून जगणाऱ्या या फुलपाखरामुळे विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या चिंता वाढण्याची भीती व्यक्त करून त्यांनी थेट राज्य सरकारच्या निर्णयावरच बोट उचलले. ज्यांनी कुणी या निर्णयाबाबत आग्रह धरला त्यांच्या अभ्यासावर बोट उचलल्याने आता या निर्णयाच्या समर्थकांनीही पीटर यांना आव्हान दिले आहे.
राज्याच्या निर्णय चुकीचा असेल तर त्या संदर्भातील संशोधन पेपर किंवा माहिती त्यांनी प्रसिद्ध करावी, असे आव्हान राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष व फुलपाखरांचे गाढे अभ्यासक डॉ. विलास बर्डेकर यांनी दिले. संत्र्याच्या कीडीच्या यादीत शेकडो कीटकांचा समावेश असून त्यात फक्त ‘लाईम बटरफ्लाय’ या एकाच फुलपाखराचा समावेश आहे. मात्र, या फुलपाखराच्या अळ्या फक्त कोवळी पानेच खातात आणि त्याला ‘मायनर पेस्ट’ म्हणून गणले जाते. शेतकरीही याला शत्रू समजत नाही. कारण, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ हे फुलपाखरू संत्रावर्गीय वनस्पतीच्या पेस्टच्या यादीतसुद्धा नाही. त्यामुळे फुलपाखरू अभ्यासक हेच फुलपाखराला ‘पेस्ट’ कसे काय ठरवू शकतात, ते काम शेती संशोधकांचे आहे, या शब्दात फुलपाखरावर संशोधन करणारे डॉ. जयंत वडतकर यांनी आव्हान दिले आहे. जंगल प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतीवर जगणारे हे फुलपाखरू आहे आणि संत्रा पीक हे जंगल क्षेत्रात किंवा पहाडी भागात घेतले जात नाही. परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे फुलपाखरू आहे म्हणून शेतकरी आहे. पतंगामुळे थोडेफार नुकसान होऊ शकते. कारण, पतंगाच्या अळ्या जाडय़ा असतात. मात्र, समाजमाध्यमांवरून ‘ब्ल्यू मॉरमॉन’वर संत्रावर्गीय वनस्पतीसाठी घातक असल्याचा शिक्का बसवणाऱ्यांनीच ही बाब पुन्हा तपासून पाहावी, असे मत अमरावतीचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी व्यक्त केले.