आरोग्य सेवेत गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारने वाखाणण्याजोगे काम केले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही कौतुक करण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले.
विभागीय आरोग्य संकुल इमारत उद्घाटनप्रसंगी शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर होते. राज्यमंत्री अमित देशमुख, आमदार दिलीपराव देशमुख, वैजनाथ िशदे व सुधाकर भालेराव, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे व आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. सुनील पाटील उपस्थित होते. पाच वर्षांपूर्वी शहरात विभागीय आरोग्यसंकुलाची इमारत बांधून तयार होती. तांत्रिक कारणामुळे इमारतीचे उद्घाटन लांबले. ही वास्तू विलासराव देशमुख यांना समर्पित करण्यात येत असल्याचे शेट्टी यांनी यांनी सांगितले.
राज्यात २ कोटी ११ लाख कुटुंबांना लागू होणारी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रिया या योजनेत होतात. औषध, जेवण व येण्या-जाण्याचे गाडीभाडेही दिले जाते. केवळ ३३३ रुपये विमाहप्ता भरून दीड लाखांची हमी या योजनेत मिळवण्यात आली. जगभरातूनच या योजनेचे कौतुक होत असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. राज्यातील सर्व जिल्हय़ांत ही योजना सुरू आहे. गेल्या ६ महिन्यांत २ लाख ४० हजार ३ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. सर्व जिल्हय़ांत अत्याधुनिक सुविधा असलेल्या ९३० रुग्णवाहिका तनात केल्या. अध्र्या तासात रक्त उपलब्ध करणारी ‘जीवन अमृत’ योजनाही केवळ महाराष्ट्रातच सुरू आहे. महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले असून देशात राज्याचा या बाबत दुसरा क्रमांक आहे, असेही ते म्हणाले.
निलंगेकर यांनी जिल्हय़ाच्या नियोजनात आपला सहभाग प्रारंभापासून आहे. त्याच्या अंमलबजावणीचे श्रेय विलासराव देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर यांना असल्याचे सांगितले. राज्य व केंद्राच्या योजना चांगल्या असूनही लोकांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुलीही त्यांनी दिली. आमदार दिलीपराव देशमुख यांनी, शेट्टी यांचे केलेले उल्लेखनीय कार्य महाराष्ट्रभर फिरून सांगण्याची गरज व्यक्त केली.
राज्यमंत्री अमित देशमुख म्हणाले, की जर्मनी व इंग्लंडमधील तंत्रज्ञान राज्यातील ग्रामीण जनतेच्या आरोग्य सेवेसाठी शेट्टी यांनी आणले. जिल्हय़ातील सव्वाचार लाख जनतेला राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचा लाभ मिळणार आहे. सव्वा लाख लाभार्थ्यांना कार्डचे वाटप झाले. उर्वरित ३ लाख जणांना जुलअखेर वाटप केले जाणार असल्याचे सांगितले.
आरोग्य संकुल इमारतीत लातूर, उस्मानाबाद, बीड व नांदेड या ४ जिल्हय़ांचे विभागीय कार्यालय, कुष्ठरोग विभाग, हिवताप कार्यालय व प्रयोगशाळा असे स्वतंत्र कक्ष आहेत. उपसंचालक डॉ. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सूर्यकांत निसाले यांनी आभार मानले.
घरचा आहेर!
राज्यातील सरकारने चांगली कामे केली. मात्र, जे करतात ते सांगत नाहीत. सांगत नसल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत व पोहोचले नाही की काय होते, हे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दांत दिलीपराव देशमुख यांनी आपल्याच मंडळींना घरचा आहेर दिला. आरोग्य संकुलाची भव्य इमारत लोकांच्या सेवेत रुजू होत आहे. येथे आयुक्तालयाची पूर्ण तयारी झाली आहे. आता जबाबदारी नव्या नेतृत्वाची आहे, असेही ते म्हणाले.