पावसाची आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. पण या संकटास राज्य शासन समर्थपणे तोंड देईल. नैसर्गिक आपत्तिग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभे राहू. संभाव्य दुष्काळस्थितीवर उपाययोजनांसाठी शासन व प्रशासन सतर्क असून, प्रत्येक जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिला.
कराड विश्रामगृहावर पार पडलेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीची माहिती देताना, ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, की या बैठकीला पालकमंत्री शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्हय़ातील सर्व आमदार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आजवर दुष्काळी पट्टय़ावर लक्ष होते. परंतु, सध्या खूप पावसाच्या ठिकाणीही पाणी टंचाई जाणवू लागली असल्याने या विभागातही उपाययोजनांची गरज आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राखून ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीतील ८ कोटी सातारा जिल्हय़ातील पाणीटंचाईसाठी देण्यात येणार असून, वनविभागातील जलसिंचनासाठीही निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळ, महापूर आणि गारपीट अशा आपत्ती ओढवत आहेत. या नैसर्गिक संकटांवर राज्य शासनाने सर्वाधिक आर्थिक मदत दिली असल्याचा दावा त्यांनी केला.
जलसिंचनाचे अर्धवट प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जातील. यानंतरच नवे प्रकल्प हाती घेतले जातील, असे स्पष्ट करताना, विकासकामे चांगल्या दर्जाची व्हायला हवीत,  अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
जिल्हय़ातील माण, खटाव या दुष्काळी पट्टय़ात सरासरीच्या ५० टक्के तर, पावसाच्या पट्टय़ात ८ ते १० टक्के पाऊस झाल्याचे सांगताना, दुबार पेरणीसंदर्भात चौकशी अहवाल मागवला असल्याचे ते म्हणाले. कोयनेची जलविद्युत निर्मिती चालवणे अवघड असल्याचे सांगताना, महाकाय कोयना जलाशयातील पाणीसाठय़ाबाबत चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली.
विधानसभेसाठी कराड दक्षिण मधून आपण लढावे असा लोकआग्रह असल्याबाबत विचारले असता, त्यांनी लोकभावनेचा विचार केला जाईल मात्र, उमेदवारी संदर्भात पक्षश्रेष्ठीच निर्णय घेत असतात. असे संदिग्ध उत्तर देत, आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी होऊन निवडणुका पार पडतील, असा विश्वास दिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चितच धक्कादायक होता. लोकांनी का डावलले याबाबत आत्मचिंतन केले जात असून, चुकांची सुधारणा करून नवीन तंत्रज्ञान वापरून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचे ते म्हणाले. शरद पवारांनी कालच आघाडीचा निर्णय बोलून दाखवल्याने एकत्र लढण्यास कोणतीही हरकत राहणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. वादग्रस्त असलेले अमित शहा यांची भाजपच्या अध्यक्षपदी झालेली निवड किती परिणामकारक राहील यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, की नरेंद्र मोदींनी हळूहळू सगळा भाजप हायजॅक केला आहे. अमित शहांना दिलेली संधी म्हणजे मोदी हेच वन मॅन शो होत असल्याचे म्हणावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.