साताऱ्यामध्ये काल पार पडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते वसंत मानकुमरे यांच्यात निर्माण झालेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. काल जावळीच्या खुर्शीमुरा गावातून उदयनराजे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आली होती. वसंत मानकुमरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला होता. या प्रकारानंतर उदयनराजे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशाराही द्यायला ते विसरले नाहीत. मात्र, कार्यकर्त्यांनी शांत राहावे, भांडणातून काहीच मिळणार नाही, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

दरम्यान, वसंत मानकुमारे यांनी उदयनराजे भोसले यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. उलट उदयनराजे यांनीच मला व माझ्या पत्नीला मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले.त्यामुळेच चिडलेल्या जमावाने उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक केली, असे मानकुमरे यांनी सांगितले. दरम्यान साताऱ्याचे खासदार हे दहशत माजवण्यासाठी जावळीत आले होते आणि त्यामुळेच वसंत मानकुमरे यांच्या समर्थकांनी आपला राग व्यक्त केला, असा पलटवार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. खा. उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खर्शी-बारामुरे येथे वसंतराव मानकुमरेंना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली असून हा पूर्वनियोजित कट आहे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. ऐन मतदानाच्या दिवशी असा धिंगाणा घालणे ही त्यांची सवयच आहे. सातारकरांना या गोष्टी माहिती आहेत. जावलीतही आता त्यांनी तोच कित्ता गिरवला असला तरी ही दहशत खपवून घेणार नसून असे प्रकार चालू देणार नाही, अशा शब्दात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजेंवर जहरी टीका केली आहे. दरम्यान, खा. उदयनराजेंना भाजपची फूस असल्याचे सांगून त्यांनी बुधवारी (आज) जावळी बंदची हाक दिली.

मेढा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, खा. उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांना असे प्रकार शोभत नाहीत. दोन दिवसांपूर्वी करहरमध्ये येऊन त्यांनी मानकुमरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यातूनच खर्शी-बारामुरे येथे येऊन मंगळवारी त्यांनी धिंगाणा घातला. ते व त्यांचे कार्यकर्ते वसंतराव मानकुमरे यांचा शोध घेत आले होते. कार्यकर्त्यांच्या हातात हॉकी स्टिक होती, असा आरोपही शिवेंद्रराजे यांनी केला.