अजिंठय़ातील लेणी क्र. २६ समोर गुरुवारी सकाळी एक दगड पडला. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. हा दगड तसा फार मोठा नव्हता. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे अजिंठा लेणी संवर्धन विभागाचे अधिकारी पी. एस. दानवे यांनी सांगितले.
डोंगरावरील काही दगड पाण्यामुळे खाली सरकतात. एकमेकांच्या घर्षणामुळे ते खाली पडू शकतात, हे गृहीत धरून तसे कुंपण उभे करण्यात आले आहे. मात्र, सकाळी सहा ते आठच्या सुमारास एक दगड पडला. घडलेला प्रकार पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला कळविल्याचेही सांगण्यात आले. पावसाळय़ात काही लेण्यांमध्ये गळती होत असते. विशेषत: वेरुळ लेण्यांमध्ये ती अधिक आहे. पाण्यामुळे वा इतर काही कारणांमुळे डोंगरातील खडक हलतात का, हे तपासण्यासाठी टेलटेल नावाची काच वापरली जाते. डोंगरकपारीमधील भूगर्भातील हालचाली मोजण्यास त्याचा उपयोग होतो. गेल्या काही दिवसांत अशा कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत, मात्र पावसामुळे एक मोठा दगड पडल्याचे सांगण्यात आले.