भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली. एकमेकांवर दगडफेकही करण्यात आली. जमावाला पांगविताना पोलीस निरीक्षक जखमी झाला. पांजरापोळ चौकात शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांच्या साठजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक रवी गायकवाड यांचा आर.जी. ग्रुप व छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या रविवारी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत भांडण झाले होते. छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान हे मंडळ देवा उघडे यांनी नव्याने स्थापन केले असून उघडे हे आतापर्यंत नगरसेवक गायकवाड यांच्याबरोबर होते. त्यांच्यात मतभेद होऊन उघडे हे गायकवाड यांच्या मंडळातून बाहेर पडल्याचा राग गायकवाड गटाला होता. याच कारणावरून गायकवाड व उघडे हे दोन्ही गट पांजरापोळ चौकात एकमेकांसमोर आले. एकमेकांवर दगडफेक केली गेली. हातात तलवारी व काठय़ा घेऊन हल्ला करण्यात आला. एसटी बसस्थानकासारख्या वर्दळीच्या भागात सशस्त्र हाणामारी सुरू झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दगडफेकीत फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हे जखमी झाले. तेव्हा जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक नितीन सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज ऊर्फ पिंटू लोंढे, हिराकांत आळगीकर, कुमार आळगीकर, धम्मपाल महिंद्रकर, बाळू गोतसुर्वे, विशाल लोंढे, सुनील गायकवाड, आप्पा महिंद्रकर, पिंटू तळभंडारे, विशाल जावळे, प्रवीण गायकवाड, सचिन वाघमारे, बबलू ढावरे, कांत उघडे, देवा उघडे, दया गायकवाड, राजा डोळसे, राज भोसले, शीलवंत भोसले, राज सुर्वे, कल्याणी शंकणवेरे, वैजिनाथ सुर्वे, संदीप सुरवसे, लक्ष्मण गायकवाड आदी सुमारे ६० जणांविरूध्द गर्दी, मारामारी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.