परीक्षेत अवघड प्रश्नांचे उत्तर सापडत नाही, म्हणून सोपे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीला घेतले जातात व नंतर अवघड प्रश्नाचे उत्तर सापडत नाहीत म्हणून ते न लिहिताच पेपर सोडवण्याची पद्धत सर्रास वापरली जाते. याच पद्धतीचा वापर लातूर महापालिकेने करण्याचे ठरवल्याचे गेल्या काही वर्षांंपासून दिसून येत आहे. प्रामुख्याने मोकाट जनावरांच्या प्रश्नाबाबत याचा प्रत्यय घडताना दिसतो.
शहराचे अनेक प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नांना महापालिका हातही लावायला तयार नाही. यापकीच महत्त्वाचा प्रश्न हा मोकाट जनावरांचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहराला हा प्रश्न भेडसावत आहे. दोन-तीन वर्षांतून कधी तरी १०-२० जनावरे पकडून कोंडवाडय़ात ठेवली जातात व पुन्हा काही ना काही कारणांमुळे ती सोडून दिली जातात. मागचा अनुभव लक्षात घेऊन जनावरे पकडा, कोंडवाडय़ात ठेवा, त्याच्या वैरण-पाण्याची व्यवस्था करा व पुन्हा तसेच सोडून द्या हे करण्यापेक्षा त्यांना न पकडलेलेच बरे ही भूमिका महापालिकेकडून घेतली जाते.
जिल्हय़ातील औसा शहरात दोन वर्षांंपूर्वी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न कायमचा सोडवण्याची कृती केली होती. प्रारंभी शहरातील मोकाट जनावरांना क्रमांक देऊन त्याची गणती केली. त्यानंतर जनावरांच्या मालकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली. त्यांनी बंदोबस्त केला नाही, तर जनावरे पकडून त्याची विक्री करून तो पसा पालिकेत जमा केला जाईल, असा इशारा दिला. या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर कारवाई होईल, असे सांगितले. त्यातून औसा नगरपालिकेचा प्रश्न सुटला. तेथील जनावरांच्या मालकांनीच आपल्या जनावरांची काळजी घेतली.
छोटय़ा गावात हा प्रश्न सुटतो तर मोठय़ा गावात प्रश्न सुटायला कोणतीच अडचण यायला नको. मात्र, काहीच करायचे नाही, अशी भूमिका घेण्याचे एकदा ठरवल्यानंतर त्यांना आजूबाजूच्या उदाहरणावरून बोध न घेता पळवाट शोधायची असते. शहरातील सर्व प्रमुख चौकात जणू काही आंदोलन सुरू आहे, अशा पद्धतीने मोकाट जनावरांची गर्दी होते. अनेक जनावरांना वाहनाचा धक्का लागून पाय मोडणे, िशग मोडणे असे प्रकार घडतात. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचारही करतात. देखभालीचा मालकाला कोणताही खर्च करावा न लागता ही जनावरे दिवसभर शहरात मोकाट फिरतात. गल्लीवस्त्यात उष्टे, खरकटे फस्त करतात व रात्री मुक्कामी मालकाच्या घरी जातात. त्यामुळे जनावरांचे मालकही निवांत राहतात.
विधानसभा निवडणुकीदरम्यान सुंदर लातूर स्वच्छ लातूर हे आपले उद्दिष्ट असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी सांगितले होते, तेव्हा मोकाट जनावरांचा प्रश्न छेडला असता निवडणूक झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर घेऊन सोडवणार असल्याचे त्यांनी पत्रकारांच्या साक्षीने सांगितले होते. मात्र, निवडणूक झाल्यानंतर या प्रश्नाला हात घालून कशाला लोकांची नाराजी ओढवून घ्यायची, या विचारामुळेच या प्रश्नाकडे कदाचित पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नसावे, असे दिसते. महापालिकेकडून हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नसल्यामुळे मोकाट जनावरांप्रमाणे हा प्रश्नही मोकाट बनला आहे.