निळवंडे कृती समितीच्या कार्यकर्त्यांवरील पोलिसांच्या लाठीमाराचे पडसाद सोमवारी तालुक्यातील जिरायत भागातील अनेक गांवामध्ये उमटले. यातील काही गावांमध्ये बंद पाळण्यात आला.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी दीड वर्षांपूर्वी शिर्डी येथील एका कार्यक्रमात निळवंडेला ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले, कालव्यांना निधी का मिळत नाही, आदी बाबींची विचारणा करण्यासाठी निळवंडे कृती समितीचे कार्यकर्ते खडकेवाके येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी त्यांना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हेलीपॅडकडे रवाना झाले. मात्र हे कार्यकर्ते निदर्शने करुन गोंधळ घालतील, अशी शंका घेऊन पोलिस उपाधिक्षक विवेक पाटील यांनी या कार्यकर्त्यांना सभास्थान सोडून जाण्याचे फर्मावले. त्यामुळे कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ते बघून पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर पोलिस अधिक्षक सुनीता साळुंखे ठाकरे, उपाधिक्षक विवेक पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना बरोबर घेत कार्यकर्त्यांवर लाठीमार करुन सभा मंडपाच्या बाहेर नेताना खुच्र्याची फेकाफेक होऊन गोंधळ उडाला.
पोलिसांनी नानासाहेब जवरे (रा. जवळके, ता.कोपरगाव), नानासाहेब शेळके ( आडगाव, ता. राहाता), चंद्रकांत दिघे (वेस, ता. कोपरगाव), विठ्ठल घोरपडे (चिंचोलीगुरव, ता. संगमनेर) गंगाधर गमे( केलवड, ता. राहाता ) यांच्यासह १० ते १२ अनोळखी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यापैकी काही लोकांना पोलिसांनी सोडून देत या पाच कार्यकर्त्यांविरुध्द विविध कलमांन्वये राहाता पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिवसेना भाजप व इतर पक्षाचे कार्यकर्ते राहाता पोलिस ठाण्यात जमा होऊन घोषणा दिल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची त्यांनी मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिल्याने वातावरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी या पाच आंदोलन कर्त्यांना रविवारी रात्री उशिरा सोडून दिले.
मात्र आज या घटनेचे पडसाद जिरायती भागातील केलवड, आडगाव खुर्द, वाळकी, जवळके, या भागात उमटले. या गावांमध्ये घटनेच्या निषेधार्थ आज बंद पाळून निषेध सभा घेण्यात आल्या.कार्यकर्त्यांवर  अत्याचार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी कृती समितीचे नेते नानासाहेब शेळके यांनी केली.