नोकरभरतीतील घोटाळे टाळण्यासाठी लेखी व तोंडी परीक्षा झाल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी अंतिम निवड यादी जाहीर करावी, अशा सूचना असतानाही एका उमेदवारच्या वयाबाबत मंत्रालयातून मार्गदर्शनाचे कारण पुढे करत पुरुष आरोग्यसेवकपदाची भरती रखडली आहे. या पदासाठी सात महिन्यांपूर्वी तोंडी परीक्षा घेण्यात आली. तथापि, निकाल जाहीर झाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. उमेदवारांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी निवड समितीची बठक घेऊन निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.  बीड जिल्हा परिषदेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या पुरुष आरोग्यसेवकपदासाठीच्या लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा १९ ऑक्टोबर २०१३ रोजी घेण्यात आली. यामध्ये काही हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सरकारी आदेशानुसार तोंडी परीक्षेनंतर तात्काळ आणि शक्यतो त्याच दिवशी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करावी, असे अपेक्षित आहे. मात्र, नितीन महुवाले या उमेदवाराला वय ३३पेक्षा जास्त असल्याने अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे महुवाले याने तक्रार करून फवारणी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल असून तो प्रकृतीने ठीक असल्यास उमेदवार पात्र असल्याचा दावा केला. यामुळे जिल्हा परिषदेनेही या उमेदवाराच्या वयाबाबत ग्रामविकास सचिवांकडे मार्गदर्शन मागवले. मंत्रालयातून उत्तर न आल्याने अंतिम यादी जाहीर केली गेली नाही. ही प्रक्रिया घडून सात महिने झाले. निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.