लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर िहगोली मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रांची मतदान यंत्रे स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात आली आहेत. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या स्ट्राँग रूमला सशस्त्र पोलिसांचे त्रिस्तरीय संरक्षण असून मतमोजणी होईपर्यंत येथे २४ तास सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहणार आहेत.
येथील एमआयडीसी भागात शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये स्ट्राँग रूम बनवली आहे. मतदान झाल्यापासून ते मतमोजणी होईपर्यंत मतदार यंत्रे पूर्णपणे सुरक्षित राहावीत, त्यांच्यात कोणत्याही प्रकारे हेराफेरी करण्यास अजिबात वाव राहू नये, यासाठी अहोरात्र बंदोबस्त राहणार आहे. िहगोली, कळमनुरी, वसमत, हदगाव, किनवट, उमरखेड या विधानसभा मतदानसंघांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. इमारतीच्या एका मजल्यावर ही मतदान यंत्रे सुरक्षित ठेवली आहेत. स्ट्राँग रूमच्या सुरक्षिततेसाठी निमलष्करी दलाच्या ३० जवानांची पलटण तनात केली आहे. त्यांच्या दिमतीला दोन पोलीस उपअधीक्षक, तीन निरीक्षक, तीन फौजदार, २५ सशस्त्र गार्ड आहेत. स्ट्राँग रूममध्ये व भोवती तिहेरी पहारा ठेवण्यात आला आहे. सर्वात आत निमलष्करी दलाची सशस्त्र तुकडी आहे. बाहेरच्या वर्तुळात खास पोलीस, तर सर्वात बाहेर व तिसऱ्या फेऱ्यात जिल्हा प्रशासनाच्या सुरक्षारक्षकासह पोलिसांचे फिरते पथक आहे. स्ट्राँग रूमवर अहोरात्र नजर ठेवण्यास ६४ कॅमेरे बसविले आहेत. याबरोबरच मतदान यंत्रे सुरक्षित राहावीत, यासाठी आगीसारखा धोका लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. स्ट्राँग रूमलगतच नियंत्रण कक्ष असून, तोही अहोरात्र कार्यरत राहणार आहे. स्ट्राँग रूमच्या इमारतीत निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या इमारतीच्या २० मीटर परिसरात जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले आहे.