सुमारे सव्वादोनशे प्राथमिक शिक्षकांच्या त्यांच्याच मागणीनुसार आपसात बदल्या करण्यात आल्या असल्या तरी बदली झालेल्या अनेक शिक्षकांनी झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी शिक्षण विभागात धावपळ सुरू केली आहे. सुमारे महिना खर्च करून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या आपसातील बदल्या केल्या, मात्र या वेळखाऊ प्रक्रियेवर पाणी फिरवत काही शिक्षकांनी झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
बदल्या झालेल्यांपैकी सोळा शिक्षकांनी पुन्हा बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे, त्यासाठी गैरसोयीचे ठिकाण मिळाले. घरगुती-कौटुंबिक अडचणी अशी किरकोळ कारणे त्यासाठी देण्यात आली आहेत. आता हे प्रस्ताव मान्यतेसाठी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. शिक्षण विभागातील यंत्रणेचा अनावश्यक वेळ वाया घातल्याबद्दल, बदली रद्दची मागणी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची शिफारस करण्याचा विचार शिक्षणाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
जिल्हा बदलीप्रमाणेच शिक्षकांच्या आपसातील बदल्या रखडल्या होत्या. त्या मार्गी लावल्या तर पुन्हा झालेल्या बदल्या रद्द करण्याची मागणी अधिकाऱ्यांना त्रासदायक ठरली आहे. आपसातील बदल्यांसाठी अनेक अर्ज आले होते. मात्र दोन्ही बाजूंच्या शिक्षकांची, जातसंवर्गनिहाय संमती घेऊन, त्यांच्याच विनंतीनुसार, त्यांच्याच संमतीच्या ठिकाणी या बदल्या करण्यात आल्या होत्या. तरीही लगेचच आठवडाभरातच या बदल्या रद्द करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी पदाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल झाले आहेत.
शाळा सुरू होऊन आता पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे, मात्र शिक्षण विभागाची यंत्रणा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेतच अडकलेली आहे.