डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे वरचेवर अवघड बनू लागले आहे. निर्धारित वेळेत निकाल न लागणे, परीक्षा शुल्कात दुपटीने वाढ करणे, पेपर तपासणीत चुका, गुणपत्रिकेत चुका, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होणारी मुस्कटदाबी आदी कारणांमुळे गरीब विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होत असून, अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणच नकोसे झाले आहे.
बी.एस्सी.च्या परीक्षा शुल्कात विद्यापीठाकडून दरवर्षी भरमसाट वाढ होत आहे. तसेच एम.ए.चे परीक्षा शुल्क तीन हजारांवरून तब्बल सहा हजार रुपयांपर्यंत वाढवले आहे. या बरोबरच एम.एस्सी.चे परीक्षा शुल्क ७ हजार ५००वरून थेट १४ हजार ८९० रुपयांपर्यंत वाढवले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा कालावधीपासून ४५ दिवसांत परीक्षेचा निकाल लागणे बंधनकारक आहे. परंतु परीक्षेचा निकाल प्रत्येक वर्षी उशिरा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत कमी कालावधी उरला आहे. कारण एम.ए.च्या प्रथम वर्षांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख ३० जून होती. नंतर विद्यापीठाने सहा दिवसांची मुदत वाढवली होती.
विज्ञान विभागाच्या विद्युत शाखेतील चौथ्या सत्राच्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक अजूनही मिळाले नाही. विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाइन निकाल पाहण्यास मिळतो. गुणपत्रक न मिळाल्यामुळे या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पुढील सत्रासाठी प्रवेश घेता येत नाही. तसेच विद्यापीठाने गुणपत्रिका तयार करताना केलेल्या चुकांचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. गुणपत्रिका छपाईमध्ये चुका केल्याने हजारो गुणपत्रिका विद्यापीठाकडून जाळण्यात आल्याचे समजते. काहींची नव्याने छपाई करून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. एकंदरीत विद्यापीठ व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होणारी गरसोय थांबवावी, वाढवलेले परीक्षा शुल्क रद्द करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.