आपला महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत फार पुढे गेला, हे आम्हाला गडचिरोलीतील दुर्गम भागात राहून कधीच कळले नाही. शासनाच्या महाराष्ट्र दर्शन सहलीच्या माध्यमातून ही प्रगती प्रत्यक्ष पाहता आली, तसेच शिक्षणामुळे दुर्गम भागात राहून प्रगती साध्य करता येऊ शकते, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे मनोगत ही सहल करून नागपुरात आलेल्या या जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

आमच्याकडे घनदाट जंगल आहेत, दूरवर शाळा आहेत. आश्रमशाळांमधून शिक्षणाची सोय झाली आहे. मात्र, गडचिरोलीबाहेर निघून इतर शहरांनी कशी प्रगती केली, हे कधीच पहायला मिळाले नव्हते. या सहलीमुळे आमचे महाराष्ट्र दर्शनाचे स्वप्न पूर्ण झाले. राज्याची प्रगती जवळून बघता आल्यामुळे उच्चशिक्षण घेऊन आपली व गडचिरोली जिल्ह्य़ाच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याची प्रेरणा आम्हाला मिळाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलेल्या सहलीच्या उपक्रमाचा हा बारावा टप्पा होता. यात या जिल्ह्य़ातील दुर्गम भागातील ४२ मुले व ३७ मुली, असे एकूण ७९ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात नक्षलपीडित कुटुंबातील आणि नक्षलसदस्य असलेल्या कुटुंबातील ९ विद्यार्थ्यांचा समावेश होता.