तिसगाव अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट ; आंदोलने सुरुच, ठिकठिकाणी बंद

तिसगाव (ता. पाथर्डी) परिसरात विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा शोध न लागल्याने तिसगाव, पाथर्डीमध्ये दुसऱ्या दिवशीही आंदोलने सुरू होती. पाथर्डीत अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थिनींनी मोर्चा काढला, मांडव्यात, करंजीत बंद पाळण्यात आला, तिसगावमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी सकाळी शाळेत जाणाऱ्या सातवीतील मुलीवर मांडवे-तिसगाव रस्त्यावर एका अनोळखी मोटरसायकलस्वाराने अत्याचार केले. त्याचे तीव्र पडसाद पाथर्डी तालुक्यात उमटत आहेत. पोलीस आरोपींना तातडीने अटक केली जाईल, असे आश्वासन देत आहेत, मात्र प्रत्यक्षात आरोपीला अद्यापि अटक झालेली नाही. आरोपीची माहिती देणाऱ्यांसाठी पोलिसांनी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डीतील वसंतदादा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला.  मांडवे गावात ग्रामसभा होऊन बंद पाळण्यात आला. नंतर तेथील व्यापाऱ्यांनी तिसगावच्या वृद्धेश्वर चौकात येऊन रास्ता रोको आंदोलन केले. करंजी गावातही बंद पाळण्यात आला. पाथर्डीत काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीच्या शोधासाठी पोलिसांना निवेदन दिले. काल पाथर्डीत दगडफेक होऊन एका एसटीबसची काच फुटली. यासंदर्भात पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हा खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप करत पंचायत समिती सदस्य देवीदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचा निषेध करण्यासाठी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

विद्यार्थ्यांना बससेवा

अत्याचाराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तिसगाव परिसरात शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मान्य केली आहे. सोमवारपासून ही बस सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.