इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या विषयावर अभ्यास करून निर्णय घेऊ. मराठवाडय़ाच्या सर्वागीण विकासाला राज्य सरकार बांधिल असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. आयआयएम मराठवाडा कृती समितीच्या सदस्यांनी नागपूर येथे फडणवीस यांची भेट घेऊन आयआयएम ही शिखर संस्था औरंगाबाद शहरातच व्हावी, अशी मागणी लावून धरली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
आयआयएम औरंगाबादेतच व्हावे, या साठी विविध संस्था-संघटनांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते पुढे आले असून, अलीकडेच दोन दिवस या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी औरंगाबाद शहरात लाक्षणिक उपोषणही करण्यात आले होते. या मोहिमेचा पुढचा भाग म्हणून बुधवारी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी रेटून धरण्यात आली. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे (सीएमआयए) अध्यक्ष मुनीष शर्मा, उपाध्यक्ष आशीष गर्दे, माजी अध्यक्ष उमेश दाशरथी, मुकुंद कुलकर्णी, मानद सचिव रितेश मिश्रा, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे (मसिआ) अध्यक्ष भरत मोतिंगे, औरंगाबाद इंडस्ट्रीअल सप्लायर्स असोसिएशनचे (आयसा) विजय जैस्वाल, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे (एजेव्हीएम) अध्यक्ष अजय शहा आदी या वेळी उपस्थित होते.