गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना मरणयातना भोगायला लावणाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सीबीआय चौकशीची मागणी करण्यासारखा पुळका आणण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला आमदार पंकजा मुंडे यांनी लगावला.
संघर्ष यात्रेनिमित्त मुरूड येथील शिवाजी चौकात आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड, रमेशअप्पा कराड, सुरजितसिंह ठाकूर, गोिवद केंद्रे, दिलीपराव देशमुख, ओमप्रकाश गोडभरले, हणमंतराव नागटिळक यांची उपस्थिती होती. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी माझे सर्व दुख बाजूला ठेवून मदानात उतरले आहे. कोणीही माझ्या पित्याच्या मृत्यूचे राजकारण करू नये. लाल दिव्याची गाडी अथवा मुख्यमंत्रिपद हे मुंडेसाहेबांचे स्वप्न नव्हते, तर शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस यांना शासनकर्ता बनवणे हे त्यांचे स्वप्न होते. याच स्वप्नपूर्तीसाठी मी मदानात उतरले आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
आघाडी सरकारने १७ हजार कोटींवर असणारे कर्ज ३ लाख कोटींवर नेऊन ठेवले. औद्योगिक धोरण संपविले. महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योग कमी झाले. चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन हवेत विरले. अशा सरकारची सत्ता उलथवून टाकून महिलांना सुरक्षा, तरुणांना रोजगार, शेतकरी, कष्टकरी, दीनदलितांच्या समस्यांना संपवणारे सरकार आपल्याला आणायचे आहे, असे त्या म्हणाल्या. १९९५ची संघर्षयात्रा परिवर्तनाची नांदी ठरली. आज मुंडेसाहेब असते तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन भ्रष्टाचारी सरकारची लक्तरे त्यांनी वेशीवर टांगली असती. त्यांचे स्वप्न खरे करण्यासाठी मी रस्त्यावर उतरले आहे. समाजसेवेचा वारसा नसतो तर तो वसा असतो. पित्याकडून मिळालेला हा वसा मी कधीच खाली ठेवणार नाही, असेही त्या म्हणाल्या. रमेशअप्पा कराड यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निश्चितच परिवर्तन होईल, यात शंका नसल्याचे प्रतिपादन केले.