विदर्भस्तरीय मेळाव्यात आश्वासन

वीज कंपनीतील तांत्रिक कामगारांचे प्रश्न व मागण्या न्याय असून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दाताळा मार्गावरील जिजाऊ लॉनमध्ये आयोजित विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी युनियनचे केंद्रीय अध्यक्ष विष्णूस्वरूप पाटील होते.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे, मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता हरीश गजभे, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, सरचिटणीस आर.टी. देवकांत, युनियनचे उपाध्यक्ष नारायण सोनवणे, राज्य सचिव संतोष घारगे, केंद्रीय उपसचिव आर.जे. देवरे, रवी बारई आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तांत्रिक कामगारांच्या मागण्या समजून घेतल्या असून याविषयी ऊर्जामंत्र्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. निवृत्तीवेतन आणि कामाचा भार या दोन महत्वाच्या मागण्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

अटेन्शन राहा पेन्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, आजही राज्याच्या अनेक गावात वीज पोहोचलेली नाही व गळतीही मोठय़ा प्रमाणात होतांना दिसत आहे. वीज कंपन्यांच्या कार्यालयाची दूरवस्था झाली असून सामान्यांना ते आपले वाटावे, असे निर्माण करा, असा सल्ला त्यांनी दिला. वीज कंपन्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात २ हजार ७०० कोटींचे अनुदान दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

तांत्रिक कामगारांनी जबाबदारीने काम करावे, असे सांगून विष्णूस्वरूप पाटील म्हणाले की, निवृत्तीवेतन, वेतनात समानता, कामगार संरचना व वैद्यकीय सुविधा या महत्वाच्या मागण्या आहेत.

त्या सरकारने पूर्ण कराव्या. सामान्य ग्राहकांना स्वस्त व अखंड विजपुरवठा मिळण्यासाठी तांत्रिक कामगारांची जबाबदारी मोठी आहे. गावागावाला लागणाऱ्या विजेचा डाटा आपल्याकडे असायला हवा, या उद्देशाने काम करण्याचा सल्लाही त्यांनी तांत्रिक कामगारांना दिला. या कार्यक्रमाला विदर्भातील तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.