यावर्षीच्या गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल २ हजार ३०० रूपये देण्याचा निर्णय रविवारी येथे झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्य़ातील साखर कारखानदार उपस्थित होते. दरम्यान २ हजार ३०० रूपयांच्या पहिली उचलीवर शेतकरी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिवाळीतच ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यांवर उतरणार असून उद्या सोमवारी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने हा निर्णय घातक असल्याने ते आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आंदोलनात उतरतील अशा संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर शेतकरी संघर्ष समितीचे नेते कॉ.गोविंद पानसरे यांनीहा दर अमान्य करून शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.उसाला पहिली उचल तीन हजार रूपये मिळावी व गतहंगामातील उसाला ५०० रूपयांचा हप्ता मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. परिणामी तीन आठवडय़ांहून अधिक काळ ऊस गाळप हंगाम लांबत चालला आहे. शासनाने उस दराबाबतचा निर्णय कारखाना पातळीवर घ्यावा, असे जाहीर केले आहे. त्यामुळे ५ दिवसांपूर्वी कोल्हापुरात जिल्ह्य़ातील कारखानदारांची बैठक झाली होती. त्यामध्ये एकमत न झाल्याने आज पुन्हा बैठक घेण्यात आली.     
आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या कारखान्यांच्या प्रतिनिधींनी जादा दर देऊ नये अशा भावना व्यक्त केल्याने सक्षम कारखान्यांच्या प्रतिनिधींची अडचण झाली. कांही काळानंतर आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके व माजी मंत्री प्रकाश आवाडे हे तिघे जण खासदार सदाशिवराव मंडलिक यांना भेटण्यासाठी गेले. त्यांनी मंडलिक यांच्याशी चर्चा केली. बैठकीनंतर खासदार मंडलिक, आमदार सा.रे.पाटील व आमदार महाडिक यांनी उसाला पहिली उचल २हजार ३०० रूपये देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. शेतकरी संघटनांनी उस दराचा प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये. त्यांनी हा दर मान्य करून हंगाम सुरू होण्याची कोंडी दूर करावी, असे आवाहनही केले.दरम्यान, या निर्णयाला खासदार शेट्टी यांनी तीव्र विरोध केला आहे.