कोयनेतील कपात करण्यात आलेल्या ४ टीएमसी पाण्यामुळे नदीकाठची ऊसशेती धोक्यात आली असून, या पाणी कपात धोरणाचा पुनर्विचार करून विजेचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी दिला आहे.
कोयनेत अपुऱ्या पावसामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. धरणात सध्या ७५ टीएमसी पाणीसाठा असून वीजनिर्मितीसाठी यापकी ६७.५ टीएमसी पाणी वापरण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. शेती व औद्योगिक वापरासाठी २६ टीएमसी पाण्याची गरज असताना हे पाणी ४ टीएमसीने कमी करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने नदीकाठावर उभ्या पिकांनाच पाणी देण्याचे धोरण जाहीर केले असून, उसाची नवीन लागण, खोडवा, निडवा घेण्यास मनाई केली आहे.
जलसंपदा विभागाच्या या निर्णयाचा फार मोठा फटका पुढील हंगामात ऊसशेतीसह साखर कारखानदारीला बसणार आहे. यामुळे शेतीचे अर्थकारणच धोक्यात येण्याची चिन्हे असून, या धोरणाचा फेरविचार करावा. वीजनिर्मितीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यापकी 4 टीएमसी पाणी पूर्वीप्रमाणेच सोडण्यात यावे. वीजनिर्मितीसाठी अन्य पर्यायांचा विचार करावा असे आवाहन करून आ. पाटील यांनी सांगितले, की जलसंपदा विभागाने आपल्या धोरणाचा फेरविचार केला नाहीतर जनआंदोलन करण्याशिवाय पर्यायच नसल्याचेही त्यांनी सांगितले.