राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या वेतनवाढीचा करार आणि कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, प्रॉव्हिडंट फंड, बोनस, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, ऊसतोडणी दर टनाला ३५० रुपये भाव मिळावा, या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे सादर करण्यात आले.
  या मोर्चास टाऊन हॉल येथून सुरुवात झाली. महानगरपालिकामाग्रे, बिंदू चौक, आईसाहेबांचा पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, वसंत विहारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाप्त झाला. विविध भागांतील सुमारे ५०० हून अधिक कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेले ऊसतोड व वाहतूक कामगारांनी हातात ऊस धरून विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. हा मोर्चा संघटनेचे राज्यसरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढला. या मोर्चात राज्यउपाध्यक्ष प्रा. आबासाहेब चौगुले, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आर.एन. पाटील, कॉ. दिनकर आद्मापुरे, कॉ. भगवान पाटील, कॉ. दिलीप पोवार, बाबासो कोईगडे, महादेव गुरव, किरण कांबळे, संभाजी कांबळे, बाबासो कुरुंदवाडे, दिनकर मिणचेकर यासह भोगावती, शाहू, कुंभी, वारणा, शिरोळ दत्त कारखाना परिसरातील कामगार सहभागी झाले होते.