24 October 2017

News Flash

त्या कंपन्यांची नावे जाहीर करावीत – सुनील तटकरे

एसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाल्यानंतर तटकरे यांनी प्रथमच या संदर्भात जाहीर प्रतिक्रिया दिली.

प्रतिनिधी, अलिबाग | Updated: October 25, 2015 2:24 AM

किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत. सिंचन घोटाळ्यातील तथ्य लाचलुचपत विभागाच्या तपासात समोर येईल. सोमय्या यांनी त्या सर्व कंपन्यांची नावे लवकरात लवकर जाहीर करावीत, असे आव्हानच तटकरे यांनी दिले.
ते रोहा तालुक्यातील सानेगाव येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. सिंचन घोटाळ्यातून काढण्यात आलेले ८०० कोटी रुपये हे अजित पवार व सुनील तटकरे यांच्याशी संबंधित ३०८ बोगस व बेनामी कंपन्यांमध्ये जमा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला होता. सोमय्या प्रसिद्धीसाठी असे आरोप करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाल्यानंतर तटकरे यांनी प्रथमच या संदर्भात जाहीर प्रतिक्रिया दिली.
सोमय्या यांनी सांगितलेल्या सर्व बोगस कंपन्यांची नावे लवकरात लवकर जाहीर करावीत, असे आव्हानही त्यांनी दिले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी त्याबाबत अधिक काही बोलणार नाही, परंतु चौकशीत सत्य बाहेर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या बोगस कंपन्यांमध्ये ठाकरे कुटुंबीय संचालक असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. या संदर्भात आपण बोलणे उचित नसून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे त्याबद्दल बोलू शकतील, असे तटकरे यांनी सांगितले.

First Published on October 25, 2015 2:24 am

Web Title: sunil tatkare refuse all aligation made by kirit somaiya