वादग्रस्त बदली प्रकरणात जिल्हाभर चच्रेत असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याविरुद्ध गढळा येथील बनावट शिधापत्रिका प्रकरणी वसमतच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
बोधवड िहगोलीत आल्यापासून सतत या ना त्या कारणामुळे वादग्रस्त ठरले आहेत. त्यांची बदली झाली असताना त्यांनी सुरुवातीला मंत्रालयातून स्थगिती मिळवली. ही स्थगिती उठल्यानंतर त्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेत पुन्हा स्थगिती मिळविली. त्यावर २४ जून ही सुनावणीची तारीख होती. परंतु पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीमुळे त्यांना पुढील सुनावणीची तारीख ७ जुल देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले. मात्र, बदलीच्या वादातून त्यांची सुटका होण्याआधीच आता गढाळा (तालुका कळमनुरी) येथील बनावट शिधापत्रिका प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्याने ते पुन्हा चच्रेत आले आहेत.
बोधवड हे औंढा नागनाथला तहसीलदार असतानाच्या कार्यकाळात गढाळा येथे गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिक बनावट शिधापत्रिका तयार करून स्वस्त धान्य दुकानास जोडल्याचा आरोप झाला. या बाबत विजय थोरात यांनी तत्कालीन तहसीलदार तथा जिल्हा पुरवठा अधिकारी बोधवड यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार ज्ञानोबा थोरात, तलाठी विनोद गादेकर, नायब तहसीलदार राजेश लांडगे यांच्याविरुद्ध गेल्या २८ एप्रिलला न्यायालयाच्या आदेशान्वये ५ मे रोजी औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
चारशे लोकवस्ती, हजार शिधापत्रिका!
थोरात यांच्या तक्रारीत गढाळा गाव ४०० लोकवस्तीचे असताना पुरवठा विभागाचे काही अधिकारी-कर्मचारी, तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांनी संगनमताने सुमारे १ हजार शिधापत्रिका तयार केल्याचा आरोप आहे. बनावट शिधापत्रिका प्रकरणी आरोपी असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी बोधवड यांना आतापर्यंत अंतरीम जामीन दिला होता. त्याची मुदत गुरुवारी संपली. वसमत येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बोधवड यांच्यासह इतर चौघांनी दाखल केलेला जामीन अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला.