जळगाव येथील घरकुल घोटाळय़ातील आरोपी तथा माजी मंत्री सुरेश जैन यांना तुरुंगात न ठेवता रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांना पंचतारांकित सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी तुरुंग प्रशासनाच्या अप्पर अतिरिक्त महानिरीक्षक श्रीमती मीरा बोरवणकर यांना पत्र पाठविले असून तुरुंग अधिकारी तसेच डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही सुरेश जैन यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र तेथे केवळ नोंद करण्यात येऊन वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात आले. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, मिळालेल्या माहितीनुसार जैन यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसून केवळ तुरुंगवास टाळण्यासाठी तुरुंग अधिकारी यांना हाताशी धरून ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांचा वैद्यकीय अहवाल सामान्य असूनही रुग्णालयाच्या नावाखाली पंचतारांकित सुविधा पुरविण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय उपचारांची गरज पडल्यास व आवश्यकता असल्यास शासकीय रुग्णालयातच उपचार करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचवले असतानाही हा आदेशही धाब्यावर बसविण्यात आला आहे.
सामान्यांसाठी एक कायदा व उच्चपदस्थ आरोपींना वेगळी वागणूक का, असा सवाल करून हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, सर्वासाठी कायदा समान असतो. त्याचे काटेकोर पालन व्हावे यासाठी श्रीमती बोरवणकर यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या डॉक्टरांची व्यक्तिश: भेट घेण्याची मागणी हजारे यांनी केली आहे. डॉक्टरांकडून कागदपत्रे मागविल्यास तुरुंग अधिकाऱ्यांच्या साहाय्याने उपचारांचे नाटक करून पंचतारांकित सुविधा कशा प्रकारे घेतल्या जात आहेत हे स्पष्ट होईल, असेही हजारे यांनी म्हटले आहे.
सुरेश जैन हे ५ जुलैपासून रुग्णालयात आहेत. त्यांना असा कोणता आजार आहे की, तो डॉक्टर बरा करू शकत नाहीत. मुळातच हा आरोपी उपचारांचे नाटक करून सुविधा लाटत आहे, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.