केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

रत्नागिरीसह कोकणातील अवजड उद्योगांची मुहूर्तमेढ रेल्वे कम्पोनंट फॅक्टरीच्या रूपाने रोवली गेली असून, याद्वारे सुमारे हजार ते दीड हजार स्थानिक तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभू यांनी केले. या कंपनीबरोबरच आणखीही काही उद्योग लवकरच या परिसरात निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये रेल्वे कम्पोनंट फॅक्टरीच्या कामाचा शुभारंभ काल केंद्रीय रेल्वेमंत्री ना. प्रभू यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना. अनंत गीते, खा. विनायक राऊत, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे व लोटे परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी बोलताना, ना. प्रभू म्हणाले की, कोकण रेल्वेमुळे कोकणची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. रत्नागिरीसह रायगड व सिंधुदुर्गमध्ये काही बंदरे मोठय़ा प्रमाणात विकसित होत असून, त्याला रेल्वेने जोडल्यामुळे निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे बंदरांच्या विकासाबरोबरच या भागाचा विकासही वेगाने होणार आहे. चिपळूण-कराड मार्गाच्या कामालाही लवकरच प्रारंभ होईल. या फॅक्टरीच्या कामामुळे अन्य छोटे-मोठे पूरक व्यवसायही या ठिकाणी सुरू होणार असून, त्यातूनही रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीड-दोन वर्षांत ही फॅक्टरी सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या फॅक्टरीच्या भूमिपूजनानिमित्ताने कोकणात आलेल्या ना. प्रभू यांनी रायगडमधील इंदापूर व सापे-वामने, रत्नागिरीतील वेरवली स्थानकाचे हॉल्ट स्थानकामधून क्रॉसिंग स्थानकामध्ये बदल करण्यात आलेल्या कामाचे उद्घाटन केले. त्याचप्रमाणे कणकवलीमध्ये जाऊन कणकवलीच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन केले.

लोटे येथे झालेल्या फॅक्टरी भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्ह्य़ातील एकही आमदार उपस्थित नव्हता. खेडचे आमदार संजय कदम, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण  व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे नाव उद्घाटन पत्रिकेवर नसल्यामुळे तीनही तालुक्यांमधून नाराजीचे सूर उमटत होते. हा प्रकल्प जर कोकणात आणि तोही रत्नागिरी जिल्ह्य़ात उभारला जात असताना, तीन आमदारांचे नाव उद्घाटन यादीतून का वगळण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

 

‘कोकण रेल्वेने स्वतंत्र स्थान निर्माण केले’

वार्ताहर : कोकण रेल्वेने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आहे. कोकणी माणसाच्या विकासासाठी राजकारणविरहित प्रयत्न सुरू असून, कोकण रेल्वेच्या मार्गावर नवीन सर्व स्थानके निर्माण करण्यात आलेली आहेत. आता सावंतवाडी, कुडाळ व कणकवली स्थानकाच्या बाहेर सेवाभावी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून उद्याने निर्माण करण्याला मान्यता देण्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

कणकवलीत विस्तारित स्थानक, सरकते जिने आणि वेरवली स्थानकामध्ये हॉल्ट स्थानकाचे स्थानकात परिवर्तन शुभारंभ प्रसंगी सुरेश प्रभू कणकवलीत बोलत होते.

या वेळी खासदार विनायक राऊत, आम. वैभव नाईक, राजन तेली, अ‍ॅड. अजित गोगटे, जि.प. अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सतीश सावंत, संदेश पारकर, कणकवली नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, रत्नागिरी विभागाचे बाळासाहेब निकम आदी उपस्थित होते.

या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, कोकण रेल्वेच्या मार्गावर मागणीप्रमाणे रेल्वे स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. कोकण रेल्वे आणि भारतीय रेल्वेचा समन्वय नव्हता. कोकण रेल्वेची बिकट परिस्थिती होती, पण मी रेल्वेमंत्री झाल्यावर कोकण रेल्वेला मानाचे स्थान निर्माण करून दिले आहे, असे प्रभू म्हणाले.

कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाला प्रारंभ झाला आहे. या साडेचार हजार कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यानंतर कोकण रेल्वेचे रूपच बदलेल असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. कणकवली नगरपरिषदेने रेल्वे स्थानकाबाहेर गार्डन सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देत आहेत, तसेच सावंतवाडी व कुडाळ स्थानकांच्या बाहेरदेखील संस्था पुढे आल्यास गार्डन उभारणीस मान्यता देऊ असे प्रभू म्हणाले.

वेंगुर्लेत पर्यटन मंडळाचे हॉटले, सेंट लुक्स हॉस्पिटल रेल्वेकडे दिल्यास विकसित करण्यात येईल, तसेच वेंगुर्ले, देवगड व मालवण येथे तिकीट आरक्षण केंद्रे सुरू करण्यात येतील, असे सांगितले. या वेळी खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन केले.