मी मंत्रीपद मागितलेले नाही, मंत्रीपदासाठी लॉबिंग करावे लागते आणि ते मी केलेले नाही असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शेतकरी संघटना, सुकाणू समितीविषयी कोणी काही म्हटले तरी शेतकऱ्यांच्या एकजुटीमध्ये बाधा येणार नाही अशा शब्दात शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तरही दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुकाणू समितीचा उल्लेख ‘जीवाणू’ समिती असा केला होता. केवळ अराजकता माजवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी सुरु असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला होता. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले. कोणी कितीही म्हटले तरी शेतकऱ्यांच्या एकजुटीमध्ये बाधा येणार नाही असेही शेट्टींनी म्हटले आहे. सदाभाऊ खोत आता स्वाभिमानीत नाही. त्यामुळे महायुतीतील समझोत्यानुसार आमची मंत्रीपदाची जागा रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि सात बारा कोरा करावा या आमच्या दोन प्रमुख मागण्या असल्याचे शेट्टी म्हणालेत. सरकारमध्ये राहण्याबाबत अंतिम निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेणार असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपसह सगळ्याच पक्षांमध्ये फूट असून आमच्यात फूड पडलेली नाही. येत्या आठवड्यात विदर्भात शेतकऱ्यांचा मेळावा घेऊ अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान, खोत आणि राजू शेट्टींमधील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांना एनडीएत राहायचे असेल तर त्यांना आणखी एक मंत्रीपद दिले जाईल. सदाभाऊ खोत यांचे मंत्रीपद काढून घेण्याची गरज नाही. शेट्टी यांनी एनडीएत राहावं हीच आमची इच्छा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तर नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच असेल असेही त्यांनी सांगितले.