केंद्र सरकारकडून स्वच्छता अभियानाची पाहाणी करायला आलेल्या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानासंबंधी सकारात्मक अभिप्राय देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी १ लाख ७० हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारकडून स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेने राबवलेल्या स्वच्छता योजनांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या तीन अधिकाऱ्यांनी सरकारला स्वच्छतेबद्दल सकारात्मक अभिप्राय देण्यासाठी पैशांची मागणी केली. मागील तीन दिवसांपासून स्वच्छता पाहणीसाठी हे अधिकारी औरंगाबादमध्ये आले होते. ‘औरंगाबाद शहराला स्वच्छता अभियानाच्या देशातील पहिल्या २० शहरांमध्ये स्थान देऊ. त्यासाठी अडीच लाख रुपये द्या,’ अशी मागणी या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.

‘महापालिका आयुक्त प्रकाश बकोरिया यांनी या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून संबंधित अधिकाऱ्यांना १ लाख ७० हजार रुपये स्विकारताना रंगेहात अटक केली,’ अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे. शैलेश पुरुषोत्तम बजानिया, विजय जोशी आणि गोविंद घिमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेहीजण गुजरातचे रहिवासी आहेत. या तिघांविरोधात सिडको पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘केंद्र सरकारने पाठवलेल्या पथकातील अधिकाऱ्यांना २ हजारांच्या नोटांच्या स्वरुपात लाच हवी होती. दोन दिवस त्यांनी स्वच्छता उपक्रमांची पाहाणी केल्यावर अधिकाऱ्यांनी औरंगाबाद महापालिकेच्या अधिकारी जयश्री कुलकर्णी यांच्याकडे अडीच लाखांची लाच मागितली. केंद्र सरकारला सकारात्मक अहवाल देण्यासाठी अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती. यानंतर कुलकर्णी यांनी तडजोडीचा प्रयत्न करुन ही रक्कम १ लाख ७० हजार रुपयांवर आणली. तेव्हा केंद्र सरकारने पाठवलेल्या तीन अधिकाऱ्यांनी नकारात्मक शेरा देण्याची धमकी दिली. त्यानंतर जयश्री कुलकर्णी यांनी या प्रकरणाची माहिती महापालिका आयुक्त प्रकाश बकोरिया यांना दिली. त्यांनी या प्रकरणी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यावर अटकेची कारवाई करण्यात आली,’ असे श्रीकांत परोपकारी यांनी सांगितले आहे.