धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

पंढरपूरकरांची बुधवार सकाळ काहीशी सुखद झाली. कारण शहरातील रस्ते एकदम चकाचक झाले होते आणि ज्यांनी कोणी पाहिले त्यांनी स्वछता करणाऱ्यांचे नाव न विचारातच तोंडातून आपसूक एकच नाव आले ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे. जवळपास २ हजार शिष्यगणांनी शहरात स्वछता अभियान राबविले.

पंढरपूर शहरात पालिकेच्या वतीने तर कधीतरी एखाद दुसरी स्वयंसेवी संस्था वगळता डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचा श्री समर्थ परिवार गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शहरात स्वच्छता अभियान राबवित असतो. पंढरपुरातही गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी शहरात स्वच्छता अभियान मोठय़ा शिस्तीने राबविण्यात आले होते. यामधे नगरप्रदक्षिणा परिसर, स्टेश रोड, संतपेठ, नवीपेठ, भोसले चौक, नगरपालिका परिसर, कराड नाका, कॉलेज रोड आदी भागांमधे स्त्री – पुरूष, लहान मुले यांनी एकत्र येऊन अत्यंत शांततेमध्ये स्वच्छता केली. हातामधे खराटा घेऊन सारेच आबालवृध्द हे शहरांची स्वच्छता करण्यामध्ये व्यस्त असताना दिसून येत होते.

स्वच्छता करताना देखील शिष्यगणांकडून स्वतच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती. यासाठी शहरांतील विविध भागांमधे कार्यरत असणाऱ्या स्वच्छतादूतांना हातांमधे हातमोजे, तसेच तोंडाला बांधायला मास्कदेखील यावेळी देण्यात आले आहे. साधारणपणे सकाळी  साडेसहाच्या दरम्यान साऱ्या शहराची स्वच्छता सुरू झाली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत संपूर्ण शहराची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे.

संपूर्ण रस्ता हा स्वच्छ केल्यानंतर तेथील सर्व घाण तसेच कचरा हा पोत्यामधून, पाटय़ा भरून एका वाहनामधे भरल्या जात होता. त्यानंतर सदरचा कचरा हा शहराच्या कचरा डेपोमधे जमा केला जात होता. खरंतर शहरात अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. या संस्था छोटी-मोठी कामे केली की प्रसारमाध्यमा पुढे जातात आणि काम कमी आणि प्रसिद्धी मोठी असा प्रकार होताना दिसून येतो. असे असताना दुसरीकडे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे काम कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता, दिलेले काम प्रामाणिक करणे हा आदर्श त्यांनी ठेवलाय, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही