मानव समाजाला ‘मी’ पणाचा मोठा शाप असून, त्यापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्याला वाचवण्यासाठी आपले जगणे आहे, हे निश्चित केले की तुम्ही आपोआप वाचाल, असा कानमंत्र ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी दिला.
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला व दयानंद शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘या जीवनाचे मी काय करू ?’ हा आगळा विषय तरुणांसाठी त्यांनी मांडला. व्यासपीठावर श्रीनिवास लाहोटी, सुमती जगताप, रमेश बियाणी, सुरेश जैन, अतुल देऊळगावकर यांची उपस्थिती होती. डॉ. बंग म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमासाठी लोक वेडे होत आहेत. प्रेमावर चित्रपट, नाटके काढून कोटय़वधीची उलाढाल झाली, तरीही हा विषय संपत नाही. आयुष्यात भेटलेल्या सर्वात दुखी, कष्टी माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, याचा विचार करा, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. हा विचार मनात आला की आपोआप मी गळून पडतो. बाबा आमटे यांनी न्यायालयात जाताना एक कुष्ठरोगी पाहिला व त्याच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्य वाहिले. जगभरात सर्व प्राणिमात्र कळपाने राहतात व कळपाचा विचार करतात. मनुष्य मात्र केवळ एकटय़ाचाच विचार करतो. एका घरात पती-पत्नी दोघेच असूनही एकमेकांशी भांडण्यातच वेळ घालवतात. अर्थप्राप्तीसाठी जगण्याऐवजी जीवनाला अर्थपूर्ण वळण देण्यासाठी जगा, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा राहील ते ठरवा. इतर कोणी काय करीत आहे याचा विचार न करता स्वत कामाला लागा; आपोआप जग बदलेल. जीवनाचे काय करू, या प्रश्नाचे उत्तर आपोआप सापडेल, असेही त्यांनी सांगितले. १९३०मध्ये मिठाच्या सत्याग्रहाचा निर्णय महात्मा गांधी यांनी घेतल्यानंतर मोतीलाल नेहरू यांनी त्यांना हा निर्णय चुकला असल्याचे २२ पानी पत्र लिहिले. गांधीजींनी नेहरूंना केवळ पोस्टकार्ड पाठवले व त्यावर ‘करून बघा’ असे सुचविले. नेहरूंनी गांधीजींचा आदेश मानण्याचे ठरवत सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केले. त्याच मध्यरात्री मोतीलाल नेहरू यांना राजद्रोहाखाली अटक करण्यात आली. त्या वेळी नेहरू यांनी बापूंना तार पाठवली, त्यात ‘करण्याआधीच पाहिले’ असल्याचे कळवले. आजच्या तरुणांनीही समाजाची हाक लक्षात घेऊन मन विचलित न करता समाजसेवेसाठी स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन त्यांनी केले. अतुल देऊळगावकर यांनी प्रास्ताविक केले.
‘राजनतिक काही नाही
राजकारणात राजाही नाही अणि नीतीही नाही. खुजी माणसे उभी राहिली व त्यांची सावली लांब पडली तर सूर्यास्ताची वेळ आली आहे, असे समजले जाते. राजकारणातही सध्याची स्थिती अशीच असल्याचे डॉ. बंग म्हणाले. दयानंद सभागृहात आजवर झालेल्या कार्यक्रमांचे गर्दीचे सर्व उच्चांक या कार्यक्रमाने मोडले. सभागृहाबाहेर मोठय़ा पडद्यावर कार्यक्रम पाहण्याची सोय केली होती.