टपाल तिकिटाचे शुक्रवारी प्रकाशन

जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतला असून हे व्याघ्रवैभव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे.

ताडोबाच्या जंगलातील एक वाघीण आपल्या बछडय़ावर प्रेम करत असतानाचे हे छायाचित्र चंद्रपूरच्या अमोल बैस या तरुण हौशी वन्यजीव छायाचित्रकाराने  टिपले आहे. या छायाचित्रातून प्रगट होणारे ममत्व लक्षात घेऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या छायाचित्राचे टपाल तिकीट प्रकाशित व्हावे व ताडोबाचे व्याघ्रवैभव जगाच्या नकाशावर अधोरेखित व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. यासाठी त्यांनी केंद्रीय संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली.

या छायाचित्रासह ताडोबा अभयारण्याचे महत्व व तेथील व्याघ्रवैभवाचा सविस्तर तपशील त्यांनी केंद्रीय संचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना सादर केला.

या मागणीचा पाठपुरावा करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून केंद्र सरकारने ते प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असून, जागतिक व्याघ्रदिनी २९ जुलैला रोजी हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येत आहे.