ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स व झेकोस्लोवाकिया या पाच देशांतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे २१ टूर ऑपरेटर्स व ट्रॅव्हल्स एजंटस् शुक्रवारी सकाळी ताडोबात दाखल झाले आहेत. वाघांची सायटिंग, छायाचित्रासह निसर्ग, घनदाट अरण्य आणि वन्यजीवांच्या आश्रयस्थळांची माहिती घेऊन विदेशी पर्यटकांसाठी खास पॅकेज तयार करून आंतरराष्ट्रीय सहलीचे आयोजन करणार आहेत.
मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वन्यजीवांचे अद्वितीय आश्रयस्थळ अशी या प्रकल्पाची ख्याती आहे. देशविदेशांतील लाखो पर्यटक दरवर्षी ताडोबा प्रकल्पाला भेट देतात. मात्र, अजूनही अनेक देशांतील लोकांना ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची ओळख झालेली नाही. आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत ताडोबा व तेथील वाघांची महती पोहोचावी, यासाठी आता या देशांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे २१ टूर ऑपरेटर्स व ट्रॅव्हल्स एजंटस् शुक्रवारी ताडोबात दाखल झाले. आदित्य धनवटे यांच्या टायगर ट्रेल या रिसोर्टमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला. त्यानंतर दुपारी ३ वाजता या सर्व २१ टूर ऑपरेटर्सनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची पाहणी केली. ताडोबातील वाघ, निसर्ग तसेच वन्यजीवांचे आश्रयस्थळ याबाबतही माहिती जाणून घेतली. या एक दिवसाच्या ताडोबा भेटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटर्स पाच देशांतील पर्यटकांसाठी खास पॅकेज तयार करून तेथील पर्यटकांना ताडोबात आणतील. त्यामुळे ताडोबाच्या आर्थिक उत्पादनात वाढ व एमटीडीसीचाही लाभ होईल, अशी माहिती एमटीडीसीचे हिरवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
आज दिवसभर या सर्व टूर ऑपरेटर्सने ताडोबातील रिसोर्ट, तसेच अन्य सर्व सोयीसुविधा, जिप्सी, गाइड याबद्दलही माहिती जाणून घेतली. दरम्यान, उद्याही  हे ट्रॅव्हल्स एजण्ट्स ताडोबाची सफर करणार आहेत. ताडोबाला आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशात स्थान मिळावे, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. १९३५ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने ताडोबातील वन्यजीवांची दखल घेऊन त्याला स्वतंत्र वन्यजीव प्रकल्प म्हणून घोषित केले. यानंतर १९४२ पासून गेम वार्डन या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात हा प्रकल्प अधिक प्रकाशात आला. ९ एप्रिल १९५५ रोजी ताडोबा वनक्षेत्राला तेव्हाच्या मध्यप्रदेश सरकारने स्वतंत्र राष्ट्रीय उद्यान घोषित केले. यानंतर ३१ वर्षांनंतर या प्रकल्पाला लागूनच असलेल्या स्वतंत्र अंधारी अभयारण्याची घोषणा राज्य सरकारने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी केली. ताडोबा व अंधारी या दोन्ही प्रकल्पांना एकत्र आणून एका मोठय़ा व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. अखेर १६६ चौ.कि.मी.चे ताडोबा राष्ट्रीय उद्यान व ५०९.४० चौ.कि.मी.चे अंधारी येथील वन्यजीवांची विपुलता लक्षात घेऊन राज्य शासनाने २५ फेब्रुवारी १९९५ रोजी ६२५.४० चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीची घोषणा केली. मात्र अजूनही ताडोबाला आंतरराष्ट्रीय लूक आलेला नाही. त्यासाठीच हे सर्व प्रयत्न केले जात आहेत.
या व्याघ्र प्रकल्पातील मुख्य आकर्षण म्हणजे पट्टेदार वाघ आहे. आज ताडोबात ८२ पट्टेदार वाघ आहेत. पर्यटकांची वाघ कधीच निराशा करीत नाही. साधारणत: जानेवारी ते जून हा कालावधी ताडोबातील अरण्यभ्रमंतीसाठी अतिशय उत्कृष्ट कालावधी आहे. १४ जानेवारीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते. या पानगळीला सुरुवात होते आणि बांबूच्या जंगलात लपून बसलेला वाघ उन्हाच्या तडाख्याने जंगलाबाहेर पडतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीराची होणारी लाही कमी करण्यासाठी पाणवठय़ांवर येतो आणि याच वेळी पर्यटकांना वाघाचे हमखास दर्शन होते.