जिल्ह्य़ातील दोन लाखापेक्षा अधिक ग्रामीण जनतेला सध्या ११६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ९८ गावे व २२ वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्रता असल्याने टँकर हाच एकमेव आधार आहे. ९७ खासगी व १९ शासकीय टँकरमधून पाणीपुरवठा सुरू आहे.
अंबड तालुक्यात सर्वाधिक ३५ गावे व ५ वाडय़ांमध्ये टँकर हाच पर्याय आहे. या खालोखाल बदनापूर तालुक्यात २२ गावे, ६ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरवर अवलंबून अन्य तालुक्यांतील गावे आणि वाडय़ांची संख्या पुढीलप्रमाणे : जालना ९, भोकरदन ७, जाफराबाद ५, परतूर १, मंठा ५ व घनसावंगी २५. जिल्ह्य़ात २४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. जालना तालुक्यात सर्वाधिक ६१ विहिरी, या खालोखाल घनसावंगी तालुक्यात ५५ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. ११० गावे-वाडय़ांतील २ लाख ९ हजार ४८४ जनता टँकरवर अवलंबून आहे. २३३ गावांतील अधिग्रहित २४१ विहिरींपैकी १२१ विहिरींवर सध्या टँकर भरले जात आहेत. अन्य मार्गाने पाणीपुरवठय़ासाठी ११२ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी बदनापूर तालुक्यात टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठय़ाचा आढावा एका बैठकीत घेतला.
दरम्यान, जालना शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या जायकवाडीवरील जलवाहिनीची नगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली. अनेक ठिकाणी अवैधरीत्या पाणी घेतले जात असल्याचे आढळून आले. अवैध पाणी घेतल्याबद्दल दावलगाव व दादेगाव ग्रामपंचायतींविरुद्ध जालना पालिकेने पाचोड पोलिसांत तक्रार नोंदवली. जालना पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून अवैधरीत्या पाणी घेतल्याच्या आरोपावरून ८ ग्रामस्थांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.