मध्य प्रदेशातील दोन जिल्ह्य़ांसह महाराष्ट्रातील पाच जिल्ह्य़ांच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या ‘तापी मेगा रिचार्ज प्रोजेक्ट’चे (पुनर्भरण प्रकल्प) भवितव्य आता अधांतरी अडकले आहे. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी आंतरराज्यीय प्रकल्पाचा पाठपुरावा न केल्याने या प्रकल्पाचे काम सर्वेक्षणाच्या टप्प्यावरच अडकून पडले आहे.
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी पसरलेल्या ‘बझाडा झोन’मध्ये तापी नदीच्या पुराचे पाणी प्रवाहित केल्यास मोठय़ा प्रमाणावर जल पुनर्भरण होऊ शकेल, अशी शिफारस केंद्रीय भूजल मंडळाने केली होती. त्यानंतर या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पात कोणतेही गाव किंवा अभयारण्य बुडीत क्षेत्रात जाणार नसल्याने या प्रकल्पाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, पण दोन राज्यांच्या मंत्रीस्तरीय बैठकांमध्ये दोन वेळा या प्रकल्पाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. नंतर हा विषय मागे पडल्याने हा प्रकल्प केव्हा होणार, असे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
या प्रकल्पाचा लाभ महाराष्ट्रातील अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्य़ाांसह मध्य प्रदेशातील खंडवा आणि बऱ्हाणपूर या जिल्ह्य़ांनाही होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे पाच लाख हेक्टर जमिनीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे. शिवाय वाया जाणाऱ्या तापी नदीच्या ३३ टीएमसी पाण्याचाही उपयोग होऊ शकेल. या प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
धारणी तालुक्यात प्रस्तावित आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प हा याच योजनेचा एक भाग आहे. या प्रकल्पातून २३३ किलोमीटर लांबीच्या कालव्यांमधून आणि ५० च्या वर बंधाऱ्यांच्या माध्यमातून जल पुनर्भरण केले जाणार आहे. मध्य प्रदेशातून बऱ्हाणपूर जिल्ह्य़ाच्या रामाखेडा, दहेंद्रा, नेपानगरपासून बिरोदा येथून महाराष्ट्रातील जळगावात प्रवेश करणाऱ्या १२३ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्याचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. धारणी तालुक्यातून निघणाऱ्या ११० किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे काम अजूनपर्यंत झालेले नाही, अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिली.
दरवर्षी तापी नदीच्या पुरातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रालाही नुकसान सोसावे लागते. या प्रकल्पामुळे हे पाणी अडवले जाईल, पाण्याचा सिंचनासाठी आणि पुनर्भरणासाठी वापर होऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे. ऑगस्ट २००९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मंत्रीस्तरीय बैठकीत या प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली होती, त्यानंतर या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारने विशेष रस दाखवलेला नाही. अशा स्थितीत या प्रकल्पाच्या भवितव्याविषयी शंका उपस्थित झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तापी नदीवर खारिया गुटिघाट येथे तापी टप्पा २ प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. त्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे २४४ हेक्टर क्षेत्र तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील ७३ गावे बुडीत क्षेत्रात जाणार होती. या प्रकल्पामुळे मेळघाटातील ८ हजार हेक्टर जमीन बुडीत होऊन २६ गावे बाधित होणार होती, हा या प्रकल्पाचा मुख्य अडथळा ठरला होता. नंतर या प्रकल्पाचे स्थळ रामाखेडा या गावाच्या ३.६० किलोमीटर खालील बाजूने तापी आणि गडगा नदीच्या संगमाजवळ नेण्याचे प्रस्तावित करण्यात आले, त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्र आणि धारणी शहर बुडित क्षेत्रात जाण्यापासून वाचवता येईल, असे सांगण्यात आले होते, पण या प्रकल्पाचे काम अजून प्राथमिक स्तरावरदेखील पोहोचलेले नाही.