माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार आणि आबांच्या पत्नी सुमन पाटील यांनी एक लाख १२ हजारांच्या मताधिक्याने बुधवारी विजय मिळवला. या मतदारसंघात सुमन पाटील यांच्या विजय निश्चित मानण्यात येत होता. केवळ किती मताधिक्य मिळते, याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. सुमन पाटील यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे बंडखोर उमेदवार स्वप्नील पाटील यांना अवघी १८२७३ मते पडली असून, त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.
तासगावमधील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रयत्न केले होते. त्याला इतर राजकीय पक्षांनी प्रतिसादही दिला होता. मात्र, भाजपचे स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे येथे मतदान घ्यावे लागले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सुमन पाटील यांनी मोठी आघाडी घ्यायला सुरुवात केली आणि मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायम होती. त्यांच्या आघाडीमध्ये प्रत्येक फेरीगणिक वाढच होत गेली.
तासगावमधील निवडणूक एकतर्फी होणार, असे राजकीय विश्लेषक पहिल्यापासूनच सांगत होते. सुमन पाटील किती मतांची आघाडी घेतात, हेच फक्त पाहावे लागेल, असे मत मांडण्यात आले होते. मतमोजणीवरून त्यांनी एकतर्फी विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले.
अंतिम निकाल
सुमन पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) -१,३१,२३६ मते
स्वप्नील पाटील (बंडखोर अपक्ष) – १८,२७३ मते